Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये नृत्यांगणा दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी संदीप गायकवाडला अटक केली आहे. दीपाली पाटीलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप संदीप गायकवाडवर आहे. हा आरोपी जामखेडमधील एका भाजप नेत्याचा आणि माजी उपमहापौर यांचा मुलगा आहे. प्रेमसंबंधातून संदीपने दीपालीवर लग्नासाठी सतत दबाव आणल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
दीपाली पाटीलने 23 मार्च 2024 रोजी खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. दीपालीच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांनी आरोप केला होता की, संदीप गायकवाड आणि त्याचे काही मित्र तिला अनेक दिवसांपासून सतत त्रास देत होते आणि लग्नासाठी दबाव टाकत होते.
6 जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी संदीप गायकवाडसह एकूण 6 जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संदीप गायकवाड फरार होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून आता या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
( नक्की वाचा : Dowry Harassment : दारु, ड्रग्ज, विवाहबाह्य संबंध,... राज्यपालांच्या नातसुनेची कुटुंबीयांविरोधात गंभीर तक्रार )
रोहित पवारांनी उपस्थित केले होते प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे स्थानिक आमदार रोहित पवार यांनीही या घटनेनंतर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात आणखी कोणताही उच्चपदस्थ व्यक्ती सहभागी आहे का, याची चौकशी आता पोलीस करत आहेत.