निलेश वाघ
अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एमआयएम कार्यकर्ता हाजी युसुफ इलियास याला अटक करण्यात आली आहे. मालेगावचे एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांचा तो कट्टर समर्थक मानला जातो. हाजी युसुफ इलियास यास काल रात्री उशीरा मालेगावच्या आयेशा नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही मालेगावात आपल्या कुटुंबासोबत राहते. तिच्या घरची परिस्थिती हलाखी आहे. त्यातच तिच्या वडिलांना अर्धांग वायूचा झटका आल्याने त्यांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. त्याच वेळी मालेगावच्या जुना आग्रा रोडवर असलेल्या हुसेन कंपाऊंड येथील युसुफ इलियास हा गोरगरिबांना मदत करतो असे तिला समजले. पीडित तरुणी ही मदतीसाठी आरोपी युसुफ इलियास याच्याकडे गेली होती. त्याच वेळी त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. शिवाय त्याचे व्हिडीओ ही काढले.
जानेवारी 2025 मध्ये पीडित तरुणी ही इलियास याच्याकडे मदत मागण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने तिला त्याच्या ऑफिसमध्ये बसण्यास सांगितले होते. थोड्या वेळाने तोही ऑफिसमध्ये आला. त्यानंतर तो तिच्या अंगाला स्पर्श करू लागला. शिवाय त्याच वेळी त्याने तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. ते करत असताना त्याने त्याचा व्हिडीओ ही बनवला. तू जर कोणाला याबाबत सांगितले तर मोबाईलमध्ये केलेला तुझा व्हिडीओ व्हायरल करेल , तुला जीवे मारेन अशी धमकी त्याने त्या तरुणीला दिली होती. त्यानंतर त्या मुलीच्या हातामध्ये त्याने 3 हजार रुपये दिले असा आरोप त्या पीडित तरुणीची आहे. त्यानंतर आपला व्हिडीओ व्हायरल होईल या भितीपोटी तिने झालेली घटना कोणाला ही सांगितली नाही.
आरोपी इलियास याने दिलेल्या धमकीमुळे तरुणीने आपबिती कोणाला सांगितली नाही. मात्र पुन्हा पंधरा दिवसांनी इलियास याने सदर तरुणीला फोन केला. शिवाय आपल्या ऑफीसवर येण्यासाठी सांगितलं. त्यावेळी ही त्याने त्या तरुणीवर बलात्कार केला. हे नंतर कधी थांबलं नाही. तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत राहीला. शिवाय तिच्याबरोबर तो अनैसर्गिक संबंधही ठेवण्यास दबाव टाकू लागला. तुझ्या सारख्या नवख्या मुली मला लागतात असे तो म्हणायचा असा आरोप या मुलीने आपल्या तक्रारीत केला आहे. त्यास विरोध केला म्हणून त्याने तिच्या हातावर सिगारेटचे चटकेही दिल्याचा आरोप पीडित तरुणीचा आहे.
नक्की वाचा - Thane News: नाल्यात सापडले महिलेचे मुंडके, खुनाचे रहस्य पोलिस उलगडणार
संशयित आरोपी इलियास याच्याकडून होणाऱ्या अत्याचार व धमकीमुळे हताश झालेली पीडित तरुणी रुग्णालयासमोर रडत बसली होती. त्यावेळी तिच्या ओळखीच्या महिलेने तिची आस्तेवाईक चौकशी केली. तेव्हा पीडित तरुणीने तिला आपबिती सुनावली. त्या महिलेने पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला तिला दिला. मात्र तक्रार दिल्यास इलियास माझा व्हिडिओ व्हायरल करेल आणि जीवे मारून टाकेन असे तिने सांगितले. पण संबंधित महिलेने पीडित तरुणीला विश्वास घेतले. जर तू तक्रार दिली नाही तर इलियास असाच अत्याचार करीत राहील असे ती म्हणाली. त्यानंतर पीडित तरुणीने पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी संशयित युसुफ इलियास यास अटक केली.