योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: अकोला शहरातील बैदपुरा भागात गोमास विक्री करणाऱ्या एका दुकानावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर शुक्रवारी (17 ऑक्टोबर) मोठा गोंधळ उडाला. या कारवाईनंतर दोन गट आमने-सामने आले आणि त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
नेमके काय घडले?
शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास पोलिसांनी बैदपुरा येथील गोमास विक्रीच्या संशयित दुकानावर छापा टाकला. या कारवाईनंतर परिसरात दोन गट जमा झाले आणि त्यांच्यात तणाव वाढला. या गोंधळात बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलीस जेव्हा घटनास्थळी गेले, तेव्हा पोलिसांना मारहाण झाल्याचा दावा केला गेला होता. तथापि, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी हा दावा खोडून काढला असून, पोलिसांवर कोणताही हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
( नक्की वाचा : Akola : माजी आमदाराच्या वाढदिवसाहून परतणाऱ्या कारला भीषण अपघात; 1 ठार, शहरप्रमुखासह 5 गंभीर जखमी )
या घटनेत बजरंग दलाचा एक गोरक्षक किरकोळ जखमी झाला असून, त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
खासदारांनी केली मागणी
या गोंधळ आणि हल्ल्याप्रकरणी अकोल्याचे बजरंग दलाचे प्रांत संयोजक सुरज भगेवार यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिली आहे. दरम्यान, अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी शेतकऱ्यांच्या बैलजोडी व गोवंश चोरी आणि हत्येच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली असून, दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलीस स्टेशनसमोर तणाव
घटनेनंतर, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर दोन्ही गटाचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे तब्बल 2 तास सिटी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचा मोठा बंदोबस्त तातडीने घटनास्थळी दाखल झाला आणि पुढील अनर्थ टळला.
शांततेचे आवाहन
शहरात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सध्या बैदपुरा परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात ठेवली आहे.