योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोल्यात बिश्नोई गँगने आपले जाळे पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यानंतर आता अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे हा धमकीचा फोन कॅलिफोर्नियामधून आल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एका कॉलिंग अॅपद्वारे ही धमकी देण्यात आली असून दोन दिवसांत पैसे न दिल्यास गेम करण्याची भाषा वापरण्यात आल्याने अकोल्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदारांच्या सुरक्षेत मोठी वाढ
अकोला जिल्ह्यातल्या दुसऱ्या आमदाराला धमकी मिळाल्याचे समजताच पोलीस प्रशासन तातडीने कामाला लागले आहे. आमदार साजिद खान पठाण यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून त्यांच्या संरक्षणासाठी 4 शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली आहे.
आमदार पठाण यांनी या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलीस तांत्रिक तपासाच्या माध्यमातून या धमकीचा उगम शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. राजस्थानसह इतर राज्यांतील बिश्नोई गँगच्या कनेक्शनचाही तपास सध्या सुरू आहे.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात बिश्नोई गँगची एन्ट्री? भाजप नेत्याला 2 कोटींची धमकी अन् राजकीय वर्तुळात थरकाप! )
शुभम लोणकरचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कनेक्शन
या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी शुभू उर्फ शुभम लोणकर याचे नाव प्रामुख्याने समोर येत आहे. शुभम लोणकर हा मूळचा अकोट तालुक्यातील नेव्होरी बुद्रुक गावचा रहिवासी असून त्याचे जाळे आता दुबईसह आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरल्याची चर्चा आहे. यापूर्वीही अकोल्यात त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.
राजकीय नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतही शुभम लोणकरचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. अकोट पोलिसांनी यापूर्वी त्याच्याकडून शस्त्रे खरेदी करणाऱ्या काही जणांना अटक केली होती, मात्र आता त्याने थेट लोकप्रतिनिधींना लक्ष केल्याने यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
( नक्की वाचा : Shirdi News: 'बीफ खाल्ल्यावर गोरं होतं आणि नमाज...' शिर्डीत 15 वर्षांच्या मुलीचा लग्नासाठी छळ, वाचा सविस्तर )
अकोला जिल्ह्यात हाय अलर्ट
एकामागून एक दोन आमदारांना धमक्या मिळाल्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू ठेवला असून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. बिश्नोई गँगचे स्थानिक हस्तक अकोल्यात सक्रिय आहेत का, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
आमदार साजिद खान पठाण यांना आलेल्या धमकीच्या कॉल्सचे मूळ शोधण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.