योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: अकोला शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 6 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. अखेर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली आणि शनिवारी रात्री संबंधित अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
काय आहे प्रकरण?
मिळालेली माहिती अशी की, ही घटना 12 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास घडली. पीडित चिमुकलीच्या नात्यातीलच एका 14 वर्षीय मुलाने, घरात कुणीही नसताना तिच्यावर अत्याचार केला. ही बाब जेव्हा पीडित आईच्या लक्षात आली, तेव्हा तिने पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र, धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांनी तिला साथ देण्याऐवजी तक्रार न करण्यासाठी दबाव टाकला. नवरा, सासू, नणंद आणि इतर नातेवाईकांनी तिला मारहाण करत तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिल्याचा आरोप या माऊलीने केला आहे.
( नक्की वाचा : Akola News: थंडाव्यासाठी मन नदीत उतरले अन् घात झाला! अकोल्यात नदीच्या पात्रात दोन कुटुंबांचा आधार हरपला )
पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
आपल्या पोटच्या गोळ्याला न्याय मिळवून देण्यासाठी पीडित महिलेने 5 मे रोजी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन गाठले. मात्र, तेथील पोलीस निरीक्षकांनी हे तुमचे कौटुंबिक प्रकरण आहे, असे सांगून तक्रार घेण्यास नकार दिल्याचा दावा महिलेने प्रसारमाध्यमांसमोर केला.
स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याचे पाहून महिलेने थेट पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांची भेट घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही स्थानिक पोलिसांनी कारवाईला विलंब केल्याचा आरोप झाल्याने पोलीस प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
( नक्की वाचा : Badlapur News: 17 एप्रिलच्या त्या रात्री नेमकं काय घडलं? बदलापूरमधील 'त्या' मृतदेहाचं गूढ 20 दिवसांनंतर उकललं )
माध्यमांचा हस्तक्षेप आणि पोलिसांची कारवाई
जेव्हा पीडित आईने माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडली, तेव्हा पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली. शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित चिमुकलीला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपीचे वय 14 वर्षे असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मालती कायटे यांनी दिली.
अकोला शहरात संतापाचे वातावरण
या हृदयद्रावक घटनेमुळे आणि त्यानंतर समोर आलेल्या पोलिसांच्या कथित उदासिनतेमुळे अकोला शहरात संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला सरकार महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी विविध मोहिमा राबवत असताना, प्रत्यक्ष तक्रार घेऊन आलेल्या माऊलीला अशा पद्धतीने वागणूक मिळणे ही चिंतेची बाब ठरत आहे.
आता या प्रकरणातील दोषींवर आणि तक्रार दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.