योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News :अकोल्यात सोशल मीडियावरील रील बनवण्याच्या नादात एका महिलेने मैत्रिणीच्या विश्वासाला तडा दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रीचा फायदा घेऊन आणि रील शूटच्या बहाण्याने लक्ष विचलित करून ही मोठी घरफोडी करण्यात आली. मात्र, अकोला पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तपास करत अवघ्या नऊ दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावला असून तब्बल 21 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी महिलेसह तिच्या तीन साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
अकोला शहरातील वाशिम बायपास परिसरातील सागर कॉलनीमध्ये राहणाऱ्या नेहा राजेश सावदेकर यांनी 13 फेब्रुवारी 2026 रोजी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 12 फेब्रुवारी रोजी त्या घरकामासाठी बाहेर गेल्या असताना त्यांच्या घरातील कपाटातून 138 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 90 हजार रुपये रोख असा सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले होते.
सुरुवातीला ही एक सामान्य घरफोडी वाटत होती, परंतु पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा यामागे सोशल मीडियावरील रील कनेक्शन असल्याचे उघड झाले. फिर्यादी महिलेची शेजारी राहणाऱ्या समिक्षा गवई नावाच्या महिलेशी मैत्री होती आणि त्या दोघी वारंवार एकत्र रील बनवत असत. याच मैत्रीचा फायदा घेऊन समिक्षाने चोरीचा कट रचला होता.
( नक्की वाचा : Pune News : वेटर ते आंतरराष्ट्रीय तस्कर, बुधवार पेठेतील महिलांच्या नशिबाशी खेळणाऱ्या बाबू भैय्याचं गुपित उघड )
असा रचला चोरीचा बनावट डाव
घटनेच्या दिवशी आरोपी समिक्षाने फिर्यादी नेहा यांना रील शूट करण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले होते. रीलच्या शूटिंगमध्ये नेहा यांचे लक्ष पूर्णपणे विचलित झाल्याची संधी साधून आरोपीने त्यांच्या घरातील कपाटातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. चोरी केल्यानंतर हा सर्व मुद्देमाल तिने आपल्या ओळखीच्या साथीदारांकडे लपवून ठेवला होता.
पोलिसांकडे सुरुवातीला कोणताही तांत्रिक पुरावा नव्हता, मात्र पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयितांवर नजर ठेवली. अखेर संशयाची सुई समिक्षाकडे वळली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
( नक्की वाचा : Shirdi News: 'बीफ खाल्ल्यावर गोरं होतं आणि नमाज...' शिर्डीत 15 वर्षांच्या मुलीचा लग्नासाठी छळ, वाचा सविस्तर )
चार आरोपी गजाआड
या गुन्ह्याचा पुढील तपास करत असताना पोलिसांनी अमरावती येथे सापळा रचून इतर संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपी समिक्षा गवईसह वैभव गोपनारायण, ऋतिक श्रृंगारे आणि समीर तेलखडे या चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी 138 ग्रॅम सोन्याचे दागिने, 90 हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली 50 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 21 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अंतर्गत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अकोला पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियाच्या नादात अनोळखी किंवा नवीन मित्रांवर किती विश्वास ठेवावा, असा प्रश्न या घटनेने उपस्थित झाला आहे.