Akola News : गुंतवणुकीचे आमिष दाखवत कोट्यवधींची फसवणूक; सायबर गुन्ह्यांमधील 'नागपूर मॉडेल' उद्ध्वस्त

Akola News : अकोला सायबर पोलिसांनी 2 कोटी 58 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या एका मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा छडा लावला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola News : शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली होती.
अकोला:

योगेश शिरसाट प्रतिनिधी

Akola News : अकोला सायबर पोलिसांनी 2 कोटी 58 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या एका मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा छडा लावला आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्यात सामील असलेल्या दोन मुख्य आरोपींना अकोला सायबर पोलिसांनी नागपुरातून ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

फिर्यादी अजय दिनकर देशपांडे (रा. अकोला) यांनी 12 मे 2025 रोजी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवले. या भूलथापांना बळी पडून फिर्यादींनी विविध आर्थिक व्यवहारांतून तब्बल 2,58,21,000 रुपये (2 कोटी 58 लाख 21 हजार रुपये) एवढी मोठी रक्कम गुंतवली.

मात्र, जेव्हा फिर्यादींनी नफ्याबद्दल विचारणा केली, तेव्हा फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली आणि उलट त्यांच्यावर आणखी गुंतवणूक करण्याचा दबाव टाकला. आपली मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि या गुन्ह्याचा पुढील तपास अकोला सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

( नक्की वाचा : Sangram Jagtap : आमदाराला अटक होणार? संग्राम जगताप यांच्याविरोधात फौजदारी खटला; काय आहे प्रकरण? )
 

कसा लागला छडा?

गुन्ह्याचे प्रचंड गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल पुरावे, तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि आर्थिक व्यवहारांचा बारकाईने मागोवा घेतला. या डिजिटल खुणांच्या आधारावर आरोपी नागपुरात असल्याचे निष्पन्न झाले.

Advertisement

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार, 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायबर पोलिसांचे एक पथक तातडीने नागपूरकडे रवाना झाले. या पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीने नागपुरातील एका विशिष्ट ठिकाणी छापा टाकला आणि दोन आरोपींना शोधून काढले.

पोलिसांनी या प्रकरणात  सोनू उर्फ सरिंदर नरेंद्र पतले (वय 32 वर्षे) आणि  जैद तनवीर खान (वय 21 वर्षे) या दोन आरोपूंना अटक केली. तपास पथकाने आरोपींकडून प्राथमिक चौकशीसाठी आवश्यक असलेली सामग्री जप्त केली असून, त्यांच्या वापरातील बँक खात्यांचा तपशील, झालेले सर्व व्यवहार आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Advertisement

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना 22 नोव्हेंबर 2025 रोजी अकोला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी बाजू सहायक सरकारी अभियोक्ता शैलेष शाहू यांनी प्रभावीपणे मांडली. तपासासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाला पटवून देण्यात आले. त्यानुसार, न्यायालयाने दोन्ही आरोपींना 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कस्टडी (Police Custody) सुनावली आहे.

Topics mentioned in this article