योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 60 वर्षांच्या वृद्धाने शेजारी राहणाऱ्या अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नरसापूर आणि पुण्याच्या घटनेनंतर राज्यातील ही तिसरी मोठी घटना असल्याने जनमानसात तीव्र संतापाची लाट आहे. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच नराधम आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरीसाठी बाहेर जात असत. सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने पीडित मुलगी आणि आरोपीचे नातवंड एकत्र खेळायचे. याच संधीचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या या नराधम वृद्धाने मुलीला चॉकलेट आणि पैशांचे आमिष दाखवून घरात ओढले.
गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तो मुलीवर वारंवार अत्याचार करत होता. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने चिमुकलीला दिली होती. मात्र, पीडितेने अखेर धैर्य दाखवून आपल्या आई-वडिलांना हा सर्व प्रकार सांगितला.
( नक्की वाचा : Pune News: पर्वती प्रकरणाने पुणे सुन्न! 'माझ्या नराधम बापाला फाशीच द्या', पीडित मुलीच्या आईचा टाहो )
आरोपी पसार; तीन पोलीस पथके रवाना
मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. चान्नी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला आहे. अकोल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी सांगितले की, तांत्रिक आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला जात आहे.
आरोपीचा शोध घेण्यासाठी 3 स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली असून त्याला लवकरच बेड्या ठोकल्या जातील. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास 112 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )
शक्ती कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी
या घटनेवर माजी राज्य महिला आयोग सदस्य डॉ. आशाताई मिरगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोपर्डी प्रकरणाला 10 वर्ष पूर्ण होत असतानाही अशा घटना पुन्हा घडत असणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा नराधमांवर कठोर कारवाई करण्यासाठी 'शक्ती कायद्याची' प्रभावी अंमलबजावणी करून पीडितेला त्वरित न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राज्यात महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अकोला पोलीस प्रशासन सतर्क असल्याचा दावा करत असले, तरी अशा घटनांनी पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता पोलीस या नराधमाला कधी पकडतात आणि न्यायालयाकडून त्याला काय शिक्षा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.