Akola News: 15 मिनिटांत येतो सांगून गेला, तो आलाच नाही; अक्षय नागलकरसोबत नेमकं काय घडलं ?

Akshay Nagalkar Missing Case: 26 वर्षीय तरुण अक्षय नागलकरचा शोध लागावा यासाठी नागलकर कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे वेगाने हालचाल करण्याची मागणी केली आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

योगेश शिरसाट

अकोला शहरातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. शहरातील बाळापूर रोड परिसरात वास्तव्य करणारा, 26 वर्षीय अक्षय विनायक नागलकर हा गेल्या 72 तासांपासून कुटुंबापासून दूर आहे. हा तरुण 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडला. तो बाहेर जाताना आपल्या आईला, शीला नागलकर यांना म्हणाला होता की, "आई, तू जेवण बनव, मी पंधरा मिनिटांत येतो." आईने मुलासाठी जेवण बनवले, पण ते पंधरा मिनिटांचे अंतर आता तीन दिवसांवर पोहोचले आहे आणि अक्षयचा अजूनही पत्ता लागलेला नाही.

नक्की वाचा: अकोला हादरले! गजानन हॉस्पिटलमधील रुग्णाने उचलले टोकाचे पाऊल

अक्षय नागलकर बेपत्ता कसा झाला ? (Akshay Nagalkar Missing Case)

या घटनेनंतर कुटुंबीयांनी काल (गुरुवारी) डाबकी रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतली. या प्रकरणात घातपाताची शक्यताही नाकारता येत नाहीये.  म्हणूनच, शोधकार्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि डाबकी रोड पोलीस ठाणे, अशा दोन स्वतंत्र टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. या पथकांनी अकोल्यासह शेजारच्या अमरावतीसह इतर संभाव्य ठिकाणी शोधकार्य सुरू केले आहे.

नक्की वाचा: दिवाळीच्या आतषबाजीदरम्यान अकोल्यातील सालासार मंदिरात घडला धक्कादायक प्रकार

अक्षय नागलकर कोणाच्या दुचाकीवरून गेला होता ?

पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, अक्षय नागलकरचा मोबाईल फोन शेवटचा बाळापुर रोड रेल्वे गेट आणि राजपूतपुरा खोलेश्वर रोड परिसरात सक्रिय आढळला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि मित्रांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, काही स्थानिक नागरिकांनी अक्षय नागलकर एका दुचाकीवरून जाताना पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्या दुचाकीवरील व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे, मात्र याबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अक्षय नागलकरचे कुटुंब चिंतेत

26 वर्षीय तरुण अक्षय नागलकरचा शोध लागावा यासाठी नागलकर कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे वेगाने हालचाल करण्याची मागणी केली आहे. तसेच, जर हा घातपात असेल, तर आरोपींना त्वरीत अटक करून कठोर शिक्षा व्हावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, अशीही त्यांची मागणी आहे. अकोला शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अफवा पसरवू नये आणि कुणाकडे काही घटनेविषयी माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा 

Advertisement
Topics mentioned in this article