Akola News : एका सिलिंडरमागे 1,920 रुपयांची बचत; अकोल्यात व्यावसायिकांचा जीवघेणा जुगाड

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ झाल्याने एक कमर्शियल सिलिंडरचे दर 3152.52 वर पोहोचले आहेत. या दरवाढीने हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळींसह औद्योगिक क्षेत्राला फटका बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News : घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररित्या कमर्शियल गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरतानाचे व्हिडिओ समोर आले आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून आता गॅससाठी वेगवेगळे जुगाड केले जात आहे. याचाच एक जीवघेणा जुगाड आता समोर आला आहे. घरगुती गॅस सिलिंडरमधून कमर्शियल गॅस सिलिंडरमध्ये एका लोखंडाच्या नळीद्वारे हा गॅस भरतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. अकोल्यातील काही हॉटेल व्यावसायिकांकडून असे जीवघेणे जुगाड केले जात आहेत.

१९ किलोचं व्यावसायिक सिलिंडर अर्ध्या किमतीत...

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ झाल्याने एक कमर्शियल सिलिंडरचे दर 3152.52 वर पोहोचले आहेत. या दरवाढीने हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळींसह औद्योगिक क्षेत्राला फटका बसला आहे. हे दर परवडणारे नसल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांनी भन्नाट जुगाड सुरू केला आहे. एका लोखंडाच्या नळीद्वारे घरगुती सिलिंडरमधून कमर्शियल सिलिंडरमध्ये गॅस भरला जात आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना 19 किलोचं कमर्शियल सिलिंडर आता निम्म्याच रेटमध्ये कसं उपलब्ध होईल, यासाठी हा जुगाड सुरू आहे. अकोल्यातील बहुतांश रेस्टॉरंटमध्ये असे प्रकार सुरू असल्याचं एकंदरीत चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना एका कमर्शियल सिलिंडरमागे 1920 रुपयांची बचत होते.

Advertisement

काय आहे गणित?

घरगुती सिलेंडर भाव : 933

कमर्शियल सिलेंडर भाव : 3152.52 पैसे.

जीवघेणा जुगाड...

घरगुती सिलिंडरचं वजन सर्वसाधारणपणे 14 किलो असून ज्याची किंमत 933 रुपये इतकी आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरचं वजन 19.5 किलो असून त्याची किंमत 3152.52 रुपये इतकी आहे. आता घरगुती सिलिंडरमधून कमर्शियल सिलिंडरमध्ये जुगाड करून गॅस भरणं आर्थिकदृष्ट्या हॉटेल व्यवसायिकांना परवडत असल्याचं दिसत आहे. 14 किलो वजनाचं गॅस सिलिंडरची किंमत 933 रुपये तर उर्वरित 4.5 किलोचा अंदाजे भाव 299 रुपये. अशाप्रकारे 1232 रुपयांत हॉटेल व्यावसायिक स्वतःसाठी सिलिंडर उपलब्ध करीत आहेत. त्यामुळं एका कमर्शियल सिलिंडरमागे हॉटेल व्यावसायिकांची 1920 रुपयांची बचत होत आहे. यादरम्यान, व्हिडिओमध्ये सिलिंडरचा गॅस भरतांना दिसलेला हा सर्व प्रकार जीवघेणा असून यामध्ये जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. एका घरगुती सिलिंडर मधून कमर्शियल व्यावसायिक सिलिंडरमध्ये रिफिलिंग करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. अशावेळी जमिनीच्या पातळीवरुन त्याला थोडीशी आग मिळाली की मोठा विस्फोट होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते, असं अकोला महानगरपालिका मुख्य अग्निशामक अधिकारी मनीष कथले यांनी सांगितलं.