Akola News: जेलमधील पहाऱ्यातून निसटला अन् थेट विहिरीत...;अकोला कारागृहातील घटनेने पोलिसांची झोप उडवली!

Akola News: पत्नीच्या हत्येप्रकरणी कोठडीत असलेल्या या आरोपीने थेट कारागृहातच हे टोकाचे पाऊल उचलले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola News: हा कैदी चार महिन्यांपासून अकोला जेलमध्ये होता.
अकोला:

योगेश शिरसाठ, प्रतिनिधी

Akola News: अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या या कारागृहाच्या आवारातील विहिरीत उडी घेऊन एका  कैद्याने जीवन संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या हत्येप्रकरणी कोठडीत असलेल्या या आरोपीने थेट कारागृहातच हे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्ह्यातील हिंगणी गावंडगाव येथील रहिवासी असलेला अनिल ओंकार निंबोकार (वय 35) असे आत्महत्या करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. अनिल आणि वृषाली यांचा विवाह 13 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन लहान मुले असून वृद्ध आई-वडिलांसह दोन एकर शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. 

Advertisement

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणची शिक्षिका रहस्यमयरित्या गायब, 4 दिवसांनी सापडला मृतदेह; पोलिसांनी असा लावला हत्येचा शोध )

मात्र चार महिन्यांपूर्वी कौटुंबिक वाद आणि चारित्र्यावरील संशयातून अनिलने पत्नी वृषालीची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि न्यायालयाच्या आदेशानंतर त्याची रवानगी अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना अनिलने अचानक आवारात असलेल्या विहिरीत उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच कारागृह प्रशासनात मोठी धावपळ उडाली. तातडीने बचावकार्य सुरू करून अनिलला बाहेर काढण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कैदी थेट विहिरीपर्यंत कसा पोहोचला आणि त्याने उडी मारताना सुरक्षारक्षक कुठे होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

( नक्की वाचा : Badlapur News: साडी आणून दिली नाही म्हणून डोक्यात कुकर मारून पतीला संपवलं; गुन्हा पचला होता पण... )
 

कुटुंबीयांची काय मागणी?

या घटनेची बातमी समजताच अनिलच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पत्नीच्या हत्येनंतर आता पतीनेही कारागृहातच आत्महत्या केल्याने या दोन लहान मुलांचे छत्र पूर्णपणे हरपले आहे. कारागृहातील सुरक्षेत मोठी त्रुटी राहिल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करत मृत कैद्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
 


Topics mentioned in this article