योगेश शिरसाट
अकोला-वाशिम रोडवर भीषण अपघात झालाय. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला, असा थेट कॉल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. शिंदेंनीही परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत अकोल्याचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार गोपिचंद बाजोरिया यांा फोन केला. तातडीने अपघात स्थळी जा. अपघातग्रस्तांना मदत करा असे आदेश देण्यात आले.शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर बाजोरिया ही आपल्या कार्यकर्त्यांना घेवून घटनास्थळी पोहोचले. पण तिथे गेल्यानंतर हा प्रकार भलताच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हा संपूर्ण प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा गंडा घालण्याचा होता हेच समोर आलं. हे संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर तुम्हालाही धक्का बसल्या शिवाय राहाणार नाही.
अपघात झाल्याची माहिती मिळताच अकोला जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पातुरकडे तब्बल 42 किलोमीटर अंतरावर पाहणी केली. मात्र, त्या ठिकाणी कोणताही अपघात झाल्याचे दिसून आलं नाही. दोन तासांच्या कालावधीत फोन करणारा व्यक्ती वारंवार वेगवेगळ्या ठिकाणांहून नवी माहिती देत राहिला. इतकेच नव्हे, तर त्याने फोन पे द्वारे पैसे ही मागितले. त्यामुळे संशय अधिक बळावला. अखेर हा कॉल फेक असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांने त्याचा नंबर बंद करून ठेवला.
सूत्रांच्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव प्रमोद फसाले असे सांगितले होते. एका उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवर अशा प्रकारे खोटी माहिती दिल्यानंतरही कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धावपळ केली. पण हे सर्व पैशांसाठी असल्याचं उघड झालं. त्यात थेट उपमुख्यमंत्र्यांनाच फोन करून गंडा घालण्याचा हा डाव होता. मात्र, अशा खोट्या कॉलमुळे खऱ्या गरजूंना वेळेवर रुग्णवाहिका आणि मदत मिळण्यात अडथळा येऊ शकतो. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. शिवाय खोटा कॉल करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
नक्की वाचा - Garba viral video: गरबा नाईट मधला किसींग व्हिडीओ Viral, शेवटी त्या कपलला...
दरम्यान आता याबाबत अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांनी ॲक्शन मोडवर येत कारवाईला सुरुवात केली आहे. खोटी माहिती थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून देण्यात आली होती. याच माहितीवरून उपमुख्यमंत्री कार्यालयातुन अकोल्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांना अपघाताची माहिती देण्यात आली माहिती नंतर बाजोरिया अपघात स्थळी पोहचले. मात्र हा फसवणूकीचा नवा फंडा असल्याचं समजताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आहे. आता हा गंडा घालण्याचा प्रयत्न करणारा ठग कोण आहे हे शोधून काढण्याचे आव्हान अकोला पोलीसां समोर आहे.