Akola News: धक्कादायक! जनावरे, बॅटरी आणि आता ट्रॅक्टर; अकोल्यातील नागरिक का आहेत भयभीत?

Akola News: अकोला जिल्ह्यातील आगर परिसरात सध्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शांत समजल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola News : ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News: अकोला जिल्ह्यातील आगर परिसरात सध्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शांत समजल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या चोऱ्यांच्या सत्रामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक कमालीचे हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे, लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला जाऊनही पोलिसांच्या हाती अद्याप काहीच लागलं नसल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

शेतकऱ्याचा ट्रॅक्टर लंपास; शेतीकामे संकटात

काही दिवसांपूर्वी या परिसरात एक मोठी चोरीची घटना घडली. पत्रकार आणि शेतकरी चेतन नामदेवराव फुकट यांचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात लंपास केली. एवढा मोठा ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरून नेली जात असताना पोलिसांना त्याचा साधा मागमूसही लागू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ट्रॅक्टर चोरीला गेल्यामुळे संबंधित शेतकऱ्याची शेतीकामे पूर्णपणे थांबली असून, ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

...बॅटरीपासून जनावरांपर्यंत सर्वच

आगर परिसरात चोरट्यांनी केवळ वाहनांनाच लक्ष्य केलं नाही, तर त्यांनी जनावरांचीही चोरी सुरू केली आहे. वाहनांमधील महागड्या बॅटरी, साऊंड सिस्टम, बैलजोडी आणि गाय-वासरे अशा अनेक वस्तूंची चोरी गेल्या काही दिवसांत झाली आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला जात असल्यामुळे चोरट्यांचं मनोबल वाढलं असून, आता पोलिसांची भीतीच उरली नसल्याची परिस्थिती आहे. 

( नक्की वाचा : NEET Paper Leak : नीट पेपरफुटीत पुण्याचा 'गॉड' अटकेत! मनिषा हवालदारसोबत नेमकं कनेक्शन काय? वाचा सविस्तर )

पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थांचा तीव्र संताप

या चोरीच्या घटनांनंतर उरळ पोलिस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. "आम्ही स्वतः गावोगावी फिरून आपल्या साहित्याचा शोध घेत आहोत, मात्र पोलिसांकडून केवळ तपास सुरू आहे, असं उत्तर मिळतं," अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित शेतकरी चेतन फुकट यांनी दिली आहे. 13 मे रोजी या संदर्भात तक्रार दाखल करूनही अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला नाही. पोलिसांची गस्त व्यवस्था केवळ कागदावरच असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शेतातील जनावरे आणि घरासमोर उभी केलेली वाहनंही सुरक्षित नसतील तर जगायचं कसं, असा सवाल आता आगर परिसरातील नागरिक विचारत आहेत. या वाढत्या चोऱ्यांवर तातडीनं नियंत्रण मिळवून आरोपींना जेरबंद करावं, अशी मागणी जोर धरत आहे. जर येत्या काही दिवसांत पोलिसांनी ठोस पावलं उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता पोलिस प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कसं पाहतं आणि चोरट्यांच्या मुसक्या कधी आवळतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 

Topics mentioned in this article