योगेश शिरसाट
जिल्ह्यातील माना पोलिसांनी अवघ्या आठ दिवसात बकऱ्या चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. शिवाय आरोपीला अटक ही केली आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि वापरलेले वाहन असा एकूण 4 लाख 49 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. अकोल्याच्या मुर्तीजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी येथील फिर्यादी अनिल साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या गोठ्यातील आठ बकऱ्या व एक बोकड चोरीला गेले होते. त्याची अंदाजे 63 हजार रुपये किंमत होती.
याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू झाला. मात्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपास आव्हानात्मक होता. मात्र माना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील टाकरखेड येथील आरोपी अजिम शाह कलीम शाह उर्फ बबलू याचे नाव समोर आले. यानेच या बकऱ्या चोरल्या. त्यानंतर त्या विकल्याची माहिती ही पोलीसांना मिळाली. त्यानुसार पथकाने आरोपीला ताब्यात घेतलेय.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
त्याला ताब्यात घेताना त्याच्या जवळ सात बकऱ्या आढळून आल्या. त्याची किंमत जवळपास पन्नास हजार रूपये होती. तर टाटा एस वाहन ही त्याच्या जवळ होते. याच वाहनाचा चोरीसाठी वापर केला जात होता. त्यामुळे ते वाहान ही पोलीसांनी जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व माना पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक सोळंके आणि पोलीस शिपाई आकाश काळे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे. तर या पथकाने आरोपीला अटक करून एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र आठ दिवसांत गुन्हा उघडकीस आणल्याने अकोला पोलिसांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.