Akola News : 15 हजारांवरुन वातावरण तापलं; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, गंभीर आरोपांनी खळबळ

अकोला जिल्हा खाण आणि क्रशर उद्योजक संघाचे कार्यकारी अध्यक्षांच्या तक्रारीनंतर खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola News : अकोला जिल्ह्यातील खाण आणि स्टोन क्रशर व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांकडून बेकायदेशीर रक्कम मागितल्याचा गंभीर आरोप अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अकोला जिल्हा खाण आणि क्रशर उद्योजक संघाचे कार्यकारी अध्यक्ष विवेक बिजवे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीनंतर अखेर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संघटनेतील प्रत्येक सदस्याकडून १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. काही सदस्यांनी भीतीपोटी ही रक्कम दिल्याचाही दावा करण्यात आला आहे, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.

फोन, भेटी आणि दबावाचे आरोप..

तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यादरम्यान वारंवार फोन करून तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन पैशांची मागणी करण्यात आली. काही सदस्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप करतानाच उर्वरित सदस्यांनाही रक्कम देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व बाबींचे पुरावे म्हणून कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून या रेकॉर्डिंगच्या आधारे चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या आरोपांमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Nashik News: महिन्याला 90 लाख कमाई! त्र्यंबकेश्वर मंदिरात झटपट दर्शनाचा घोटाळा; विश्वस्तच निघाला मास्टरमाईंड

चौकशीची मागणी आणि पुढील कारवाई..

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदार विवेक बिजवे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आमच्या संघातील सदस्यांकडून प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याचा दबाव टाकण्यात आला. काही जणांनी भीतीपोटी पैसे दिले. आम्ही एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून योग्य आणि कठोर कारवाईची अपेक्षा आहे.” या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने पुढील तपासात नेमकी सत्यस्थिती समोर येणार आहे. आता या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.