योगेश शिरसाट
अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील धनेगाव शेतशिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरूवारी 20 नोव्हेंबर रोजी एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. सकाळी कामासाठी प्रमोद लांडे यांच्या शेतात आलेल्या मजुरांना शेताच्या कडेला जळल्यासारखे काही तरी दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता ती वस्तू नव्हे तर एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह असल्याचे त्यांना समजले. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच मजुरांनी तत्काळ याची माहिती संबंधित मालकांना दिली. शिवाय पोलिसांना ही याबाबत कळवले.
सूचना मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता महिलेच्या अंगावरील कपडे पूर्णतः जळलेले आढळले. मृतदेहाची अवस्था पाहता मृत्यू कसा झाला, घटना कुठे घडली आणि मृतदेह येथे आणून जाळले का, याबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर शेतातील ठसे, जळलेली सामग्री, आसपासचा परिसर या सर्वांची बारकाईने तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार हा प्रकार अत्यंत संशयास्पद असल्याचे पोलिसांचे मत आहे.
या गंभीर प्रकरणाची माहिती ठाणेदार झोडगे यांनी तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी यांना दिली. माहिती मिळताच रेड्डी घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी तपास पथकाला अधिक काटेकोर तपास करण्याच्या सूचना दिल्या. सद्यस्थितीत मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परिसरातील लोकांकडून माहिती घेतली जात आहे. तसेच मागील काही दिवसांत परिसरात आढळलेल्या अनोळखी व्यक्तींबाबतही तपास केला जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक तपासणी सुरू केली असून लवकरच प्रकरणातील धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.