योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : एका विवाहित महिलेच्या संशयास्पद आत्महत्येने अकोला जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच 'तुमची आमच्यासमोर औकात नाही' असे हिणवत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका तरुण विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेपूर्वी पतीने दिलेल्या धमकीच्या फोनमुळे या प्रकरणात संशयाचे जाळे अधिक घट्ट झाले असून पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत पतीला ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
भटोरी येथील रहिवासी असलेल्या तनुजा हिचा विवाह एप्रिल 2024 मध्ये वाडेगाव येथील विशाल मानकर याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले आणि या दांपत्याला एक मुलगाही झाला. मात्र, त्यानंतर पती, सासू आणि सासऱ्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली.
तुम्ही गरीब आहात, तुमची आमच्यासमोर औकात नाही, असे टोमणे मारत तिच्यावर रोज मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले जात होते. तनुजाने या त्रासाबाबत अनेकदा आपल्या आईकडे आपबीती सांगितली होती.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई; एक्स-रे काढताच आई-वडील हादरले )
घटनेपूर्वी आला होता फोन
या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 3 ऑगस्ट रोजी दुपारी तनुजाच्या नवऱ्याने तिच्या बहिणीला फोन केला होता. तनुजाला इथून घेऊन जा, नाहीतर माझ्या हातून काही बरेवाईट होईल, अशी उघड धमकी त्याने दिली होती. या फोननंतर घाबरलेल्या तनुजाने स्वतः नातेवाईकांना फोन करून मला तात्काळ इथून घेऊन जा, अशी विनंती करत रडण्यास सुरुवात केली.
मात्र, नातेवाईक काही पावले उचलणार तोच तनुजाने गळफास घेतल्याची बातमी समोर आली. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
( नक्की वाचा : Fake Milk : तुमच्या घरातील दुधात शॅम्पू तर नाही ना? तुकाराम मुंढेंचा धक्कादायक खुलासा, असे ओळखा बनावट दूध )
पती पोलिसांच्या ताब्यात; सासू-सासऱ्यांवरही गुन्हा
मुलीच्या अचानक जाण्याने हादरलेल्या आईने बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी पती विशाल मानकर, सासू सविता मानकर आणि सासरे दिलीप मानकर यांच्याविरोधात गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर पतीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
तनुजावर तिच्या माहेरी अश्रूधाल्या नयनोबांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे माहेरच्या लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई तीव्र केली जाईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world