Akola News:दरोडेखोर हुशार, पण पोलिसांची नजर सवाई ! एका छोट्या खुणेनं उलगडलं अकोल्यातील 70 लाखांच्या लुटीचं गूढ

Akola News: 70 लाख रुपयांचे सोने लुटून पसार झालेल्या गुन्हेगाराने आपला चेहरा झाकला होता आणि दुचाकीला नंबर प्लेटही नव्हती. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola News : पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून रोहन सिंग बावरा याला बेड्या ठोकल्या
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News: अकोल्यातील एका धाडसी दरोड्याचा छडा लावताना पोलिसांनी जे कसब दाखवले, ते एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असे आहे. 70 लाख रुपयांचे सोने लुटून पसार झालेल्या गुन्हेगाराने आपला चेहरा झाकला होता आणि दुचाकीला नंबर प्लेटही नव्हती. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. दुचाकीच्या एका छोट्याशा तुटलेल्या इंडिकेटरने पोलिसांना असा काही धागा दिला की, 700 किलोमीटरचा पाठलाग करून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

काय आहे प्रकरण?

खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आदर्श कॉलनीमध्ये 5 मे रोजी दिवसाढवळ्या सप्तश्रृंगी अलंकार केंद्रावर दरोडा पडला होता. बंदुकीचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या या दरोडेखोराने तपासाचे सर्व मार्ग बंद व्हावेत अशी पूर्ण तयारी केली होती. 

Advertisement

मात्र, सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासत असताना पोलिसांच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही, ती म्हणजे आरोपीच्या दुचाकीचे तुटलेले इंडिकेटर. नंबर प्लेट नसली तरी या एका खुणेने पोलिसांना गुन्हेगाराची ओळख पटवण्यात मोठी मदत केली.

( नक्की वाचा : Pune News: आई-वडिलांचं मौन मुलीच्या जीवावर बेतलं; पुण्यात 18 वर्षांच्या श्रुतीचा भयंकर शेवट ! नेमकं काय घडलं? )

580 सीसीटीव्ही आणि 700 किलोमीटरचा थरार

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी 8 विशेष पथके तैनात केली होती. पोलिसांनी केवळ अकोला शहरच नाही, तर आसपासच्या परिसरातील तब्बल 580 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. 

तुटलेल्या इंडिकेटरची ती दुचाकी नेमकी कुठे जातेय, याचा माग काढत असताना पोलिसांना आरोपी भुसावळमध्ये असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून रोहन सिंग बावरा याला बेड्या ठोकल्या.

( नक्की वाचा : Yavatmal News: रात्री 2 वाजता नवरा ओरडला आणि बायकोचा भयंकर प्लॅन फसला; प्रियकरासोबत मिळून रचला होता कट )

चादर विक्रीच्या नावाखाली केली रेकी

तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, आरोपी रोहन सिंग हा परिसरात चादर विक्रीच्या बहाण्याने फिरायचा. याच काळात त्याने या सर्राफा दुकानाची रेकी केली होती. दुकानात सुरक्षेचा अभाव आहे आणि एकच व्यक्ती हजर असते, हे हेरून त्याने भरदुपारी या दरोड्याचा कट रचला होता. पोलिसांनी अवघ्या 1 दिवसात आरोपीकडून 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखालील टीमने या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी जीवाचे रान केले. एका तुटलेल्या इंडिकेटरवरून 70 लाख रुपयांच्या दरोड्याचा तपास लागल्याने अकोला पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Topics mentioned in this article