आळंदी परिसरातील वारकरी वसतीगृहांमध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाबाबत अनेक तक्रारी येत होत्या. याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे. पुढील दोन दिवसात 20 समिती सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत. याप्रकरणी अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्या आहेत. यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्यसेविका यांचा समावेश आहे.
NDTV मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट...
पंढरीनंतर श्रद्धास्थान असलेल्या आळंदीची वारकऱ्यांना ओढ लागलेली असते. त्याच आळंदीमध्ये वारकरी शिक्षण देण्यासाठी तब्बल 175 शिक्षणसंस्था आहेत. ज्या संस्थांमध्ये तब्बल 5 हजार मुलं वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतात. पण त्यातल्याच काही अनधिकृत संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचं शोषण होत असल्याचा आरोप झाला आणि आळंदी हादरली. या वाढत्या घटना लक्षात घेता आळंदीकर ग्रामस्थानी थेट या संबंधी महिला आयोगाकडे तक्रार केली अन् महिला आयोगाच्या तक्रारी नंतर प्रशासन अलर्ट मोड वर आले. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर महिला आयोगान्या अध्यक्षा रुपाली चाकणकर थेट आळंदीत दाखल झाल्या आणि अनधिकृत शिक्षणसंस्थांविरोधात कारवाईचे आदेश दिले.
नक्की वाचा - Shirish More : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, संघाचे प्रचारक, हभप शिरीष मोरेंनी गळफास घेत संपवलं जीवन
ज्या वारकरी शिक्षण संस्थांनी नोंद धर्मादाय आयुक्तांकडे नाही , महिला व बालविकास विभागाकडे नोंद नाही अशा सर्व तसेच नोंद असूनही नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थावर दोन दिवसांत कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. चाकणकरांच्या आदेशानंतर एनडीटीव्ही मराठीच्या टीमनं आळंदीतल्या काही वारकरी शिक्षणसंस्थांचा रिअॅलिटी चेक केला.
यावेळी मोकळ्या शेतात पखवाज वादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला घाणीचं साम्राज्य होतं. त्यामुळे संस्थाचालकांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पर्वा नाही का? असा सवाल उपस्थित होतो. अर्थात सगळ्याच संस्था अशा नाहीत. एनडीटीव्हीची टीम अशा एका शिक्षणसंस्थेत पोहोचली, जिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही, सकस आहार, पिण्यास आर ओचे शुद्ध पाणी, विद्यार्थांना आरोग्याच्या दृष्टीने अनेक सुविधा पुरवल्या जात असल्याचं पाहायला मिळालं.
नक्की वाचा - Pune News: तरुणाच्या नको त्या ठिकाणी बाम लावला, नंतर Video काढला, कारण ऐकून हैराण व्हाल
एका धर्मशाळेतल्या तिसऱ्या मजल्यावर काही खोल्या भाड्याने घेतल्या, जिथे 40 विद्यार्थी राहत होते. अस्वच्छ स्वयंपाकघर...ना खिडकी...ना सूर्यप्रकाश...ना सीसीटीव्ही कॅमेरे..जिन्यात घाणीचं साम्राज्य, स्वच्छतागृहांचे तुटलेले दरवाजे आणि काही शिक्षणसंस्थांच्या तर नोंदीही नाहीत. काही संस्थाचालकांना तर वारकरी संप्रदायाची माहितीही नाही. जागा भाड्याने घ्यायची. विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा... 20 ते 40 हजारांचे शुल्क घ्यायचे आणि संस्थेचा कोंडवाडा करायचा आणि मग याच कोंडवाड्याआड विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करायचे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे वारकरी शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या या कोंडवाड्यांना कधी आळा बसणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.