Allahabad High Court : उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालय हे तेथील न्यायाधीशांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. मुलीचे स्तन पकडणे आणि पायजम्याचा नाडा खेचणे हा बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न या श्रेणीत येत नसल्याचं अलाहाबाद उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी झालेल्या निकालात म्हटलं होतं. त्यांच्या या निकालाची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली. हे प्रकरण ताजं असतानाच या कोर्टाचा आणखी एक निर्णय पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोर्टानं काय सांगितलं?
अलहाबाद उच्च न्यायालयानं बलात्कार प्रकरणातील एका पीडितेलाच कथित अपराधासाठी जबाबदार धरलं आहे. तसंच या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केलाय. सप्टेंबर 2024 मध्ये या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणीनं बारमध्ये भेटलेल्या व्यक्तीनं तिच्यावर नशेच्या अवस्थेत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तर आरोपीनं महिला आपल्याबरोबर सहमतीनं येण्यास तयार झाली होती, असा दावा जामीन याचिकेत केला होता.
न्या. संजय कुमार सिंह यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणातील आरोपीला 11 सप्टेंबर 2024 रोजी अटक करण्यात आले होते. त्याच्यावर दिल्लीमधील हौज ए खास बारमध्ये भेटलेल्या एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. कोर्टानं या सुनावणीमध्ये सांगितलं की, महिलेनं स्वत:च संकटाला निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे तीच या कथित प्रकरणाला जबाबदार आहे.
( नक्की वाचा : Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं! )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील नोएडामधील एका विद्यापीठात शिकणारी तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत दिल्लीतील बारमध्ये गेली होती. विद्यार्थीनींनी सांगितलं की तिला बारमध्ये काही ओळखीचे व्यक्ती भेटले. त्यामध्ये आरोपीचाही समावेश होता. पीडितेनं नोएडा पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दारु पिल्यानंतर ती नशेत होती आणि आरोपी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता.
पोलिसांनी सांगितलं की, ते सर्व पहाटे तीन वाजेपर्यंत बारमध्ये होते. आरोपी सतत पीडितेला घरी येण्याचा आग्रह करत होता. आरोपीच्या आग्रहानंतर तरुण त्याच्या घरी आराम करण्यासाठी जाण्यास तयार झाली. आरोपी संपूर्ण रस्त्यावर आपल्या शरिराला आक्षेपार्ह पद्धतीनं हात लावत होता, असा महिलेचा आरोप आहे. त्याचबरोबर त्यानं आपल्याला नोएडाच्या फ्लॅटमध्ये न नेता गुरुग्राममधील त्याच्या नातेवाईच्या फ्लॅटमध्ये नेलं आणि अत्याचार केले.
न्यायालयानं आरोपीला जामीन देताना हा सर्व प्रकार बलात्काराचा नाही. तर सहमतीने घडला असल्याचं मत व्यक्त केलं. पीडित व्यक्तीच याला जबाबदार आहे, असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. आरोपी 11 डिसेंबरपासून जेलमध्ये आहे. त्याचा गुन्हेगारीचा कोणताही इतिहास नाही. तो जामीन दिल्यानंतर फरार होण्याची किंवा पुराव्याशी छेडछाड करण्याची शक्यता नाही, असं मत न्या. सिंह यांनी आरोपीला जामीन देताना व्यक्त केलं.