अमजद खान
अंबरनाथच्या प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किरण शिंदे यांना त्यांच्या पतीने खलबत्त्यानं मारहाण केली आहे. त्यांनी त्यांच्या डोक्यात हल्ला करत जीव घेण्याचाच प्रकार केला. या नंतर किरण शिंदे यांना बदलापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शिवाय त्यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
डॉक्टर किरण शिंदे या अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया गृह संकुलात पती आणि दोन मुलांसह राहतात. बुधवारी सकाळी त्या गाण्याचा रियाज करण्यासाठी उठल्या होत्या. रियाज करण्यापूर्वी त्या पती विश्वंभर शिंदे यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेल्या होत्या. त्याचवेळी विश्वंभर शिंदे हे किचनमध्ये आले. डॉक्टर किरण शिंदे यांना काही समजण्याच्या आतच त्यांनी त्यांच्या डोक्यात खलबत्त्याने हल्ला केला.
हल्ला करताना त्यांच्या पतीने डॉक्टर किरण शिंदे यांचा गळा पकडला. त्यानंतर डोक्यात खलबत्त्याने हल्ला केला असाआरोप किरण यांनी केला आहे. यावेळी किरण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या मुलांनी किचनमध्ये धाव घेतली. त्यानंतर आईची सुटका त्यांनी केली. शिवाय तातडीने बदलापूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यानंतर पोलिसांनी डॉक्टर किरण शिंदे यांचं स्टेटमेंट घेतलं आहे.
नक्की वाचा - Satara Doctor Case: 'ही हत्याच!, एका 'री' ने केसला कलाटणी? सॉलिड थिअरी आली समोर
सध्या अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माझ्या एका बालमित्राने मला मेसेज पाठवला होता. नाईस डीपी असा तो मेसेज होता. त्याचा राग आपल्या पतीला आला होता. असं डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं. या मारहाणीत माझा जीवही जाऊ शकला असता त्यामुळे माझ्या पतिविरोधात माझी तक्रार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या पतीला कधी अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका डॉक्टर महिलेवरच पतीने हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world