
Amit Salunkhe: राज्यातील तब्बल 12 हजार कोटींच्या वादग्रस्त ॲम्बुलन्स टेंडर प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय! पिंपरी चिंचवडच्या ‘सुमित फॅसिलिटीज' कंपनीचा संचालक अमित साळुंखे याला झारखंडमधील 450 कोटींच्या दारू घोटाळ्याप्रकरणी रांचीमध्ये अटक झाली आहे. विशेष म्हणजे, याच कंपनीला महाराष्ट्रात 12 हजार कोटींचं ॲम्बुलन्स टेंडर मिळालंय, ज्यावर गंभीर आरोप होताहेत. या घोटाळ्याच्या मुळाशी नेमकं काय आहे? आणि यामागे राजकीय नेते कोण आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात 12 हजार कोटींचे टेंडर
झारखंडमधील 450 कोटींच्या दारू घोटाळ्याप्रकरणी पुण्याचा उद्योजक अमित साळुंखे याला झारखंड एसीबीने रांची येथे अटक केली. साळुंखे हा ‘सुमित फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड'चा संचालक आहे, ज्याला महाराष्ट्र सरकारने 12 हजार कोटींचं वादग्रस्त ॲम्बुलन्स टेंडर दिलंय. विशेष म्हणजे, या कंपनीला झारखंड सरकारने काळ्या यादीत टाकलं असतानाही महाराष्ट्रात हे टेंडर मिळालं. यामागे नेमकं काय दडलंय?, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते या प्रकरणातील मुळ तक्रारदार विजय कुंभार यांनी विचारलाय.
महाराष्ट्रातील ॲम्बुलन्स टेंडरची किंमत तब्बल 12 हजार कोटी रुपये आहे. यात ‘सुमित फॅसिलिटीज'चा 55 टक्के वाटा आहे, तर स्पेनस्थित ‘एसएसजी' आणि ‘बीव्हीजी' या कंपन्यांना उर्वरित हिस्सा मिळाला. पण बाजारभावापेक्षा तिप्पट किंमतीने हे टेंडर देण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे 10 वर्षांत सरकारला 6 हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. टेंडर प्रक्रियेत अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि विशिष्ट ठेकेदारांना फायदा देण्याचे गंभीर आरोप होत आहेत.
( नक्की वाचा : Pune News: ॲम्बुलन्स घोटाळ्यातील आरोपी अमित साळुंखेला रांचीमध्ये अटक, झारखंड दारु घोटाळ्यात कारवाई )
या प्रकरणात विजय कुंभार यांनी 4 मुद्दे सांगितले आहेत.
- हे टेंडर फक्त एका कंपनीसाठी तयार केलं गेलं. ‘सुमित फॅसिलिटीज'ला यात कोणताही अनुभव नाही, तरीही त्यांना रेड कार्पेट टाकण्यात आलं.
- महाराष्ट्रातील ॲम्बुलन्स खरेदीचा खर्च 637 कोटींवरून 12 हजार कोटींवर गेला. यामुळे तिजोरीला 30 हजार कोटींचा फटका बसणार आहे.
- अमित साळुंखे आणि त्याच्या भावाने यापूर्वी स्वच्छता, कचरा आणि उल्हासनगर टेंडर घोटाळ्यांमध्येही सहभाग घेतला आहे.
- या टेंडरचा मसुदा थेट ठेकेदाराच्या कार्यालयात तयार झाला, जे फोरेन्सिक तपासणीत सिद्ध झालंय. याची सखोल चौकशी व्हायला हवी.
विजय कुंभार यांनी प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी टेंडरमधील त्रुटी आणि अनियमितता उघड केल्या. टेंडर प्रक्रिया विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून राबवण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे.
या टेंडर प्रकरणात फक्त अमित साळुंखेच नाही, तर त्याचा भाऊ सुमित साळुंखे याचंही नाव समोर आलंय. यापूर्वी पुणे आणि उल्हासनगरातील स्वच्छता आणि कचरा टेंडर घोटाळ्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. विशेष म्हणजे, साळुंखे बंधूंना तत्कालीन सरकारच्या नेत्यांचा पाठिंबा होता, असा आरोप आहे. तेंव्हाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातही नव्या ॲम्बुलन्सचा पुरवठा झालेला नाही, आणि आजही जुन्याच ॲम्बुलन्स वापरल्या जात आहेत.
महाराष्ट्रातील ॲम्बुलन्स टेंडर घोटाळ्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. अमित साळुंखेची अटक झारखंड दारू घोटाळ्याप्रकरणी झाली असली, तरी यामुळे महाराष्ट्रातील 12 हजार कोटींच्या टेंडर प्रकरणातही चौकशीला गती मिळण्याची शक्यता आहे. टेंडरमधील त्रुटी, तिप्पट किंमती आणि विशिष्ट ठेकेदारांना फायदा देण्याचे आरोप यामुळे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आता प्रश्न असा आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार की हा घोटाळा फक्त कागदावरच राहणार?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world