लग्नाचे आमिष दाखवले, त्यासाठी गळ्यात खोटे मंगळसुत्र ही बांधले. त्यानंतर तिच्या बरोबर शरिरसंबध प्रस्थापित केले. त्यातून तरुणी गर्भवती राहीली. आपल्याला हे बाळ हवं आहे असंही त्याने तिला सांगितलं. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. पण पुढे जे घडलं त्याने त्या तरुणीवर मोठं आभाळ कोसळलं. तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिचं संपुर्ण आयुष्यच उद्धवस्त झालं. ही घटना अमरावतीमध्ये घडली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमरावतीत लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अत्याचारातून ही तरुणी गर्भवती राहीली होती. आता मात्र आरोपीने लग्नास व होणाऱ्या बाळाला स्वीकारण्यास नकार दिला आहे. ही घटना अमरावतीच्या गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत बुधवारी उघड झाली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी 26 फेब्रुवारी रोजी नीलेश खोब्रागडे या 24 वर्षाच्या तरुणा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा तरुण सावर्डी, नांदगाव पेठ इथला रहिवाशी आहे.
तरुणीने दिलेल्या तक्रारी नुसार, ती तिच्या आईसोबत एका गावात राहात होती. तिथे तिची आरोपी नीलेश बरोबर ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. टेलिफोन व सोशल मीडियावर दोघेही व्यक्त होऊ लागले. दरम्यान, 12 जानेवारी 2025 रोजी आरोपीने फिर्यादीस गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉलनीत भाड्याची रूम करुन दिली होती.
ट्रेंडिंग बातमी - Swargate case: 'मला पोलिसांनी सांगितलं तेच मी बोललो', योगेश कदम परत फसणार?
त्या रूममध्ये तोही राहत होता. त्याच वेळी त्याने तरुणीच्या गळ्यात खोटे मंगळसूत्र घातले. शिवाय तिला लग्नाचे आमिष दिले. त्यानंतर त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील झाले. त्या शरीरसंबंधांमुळे तरुणीला गर्भधारणा झाली. तिने ही बाब नीलेशला सांगितली. त्यावेळी मला हे बाळ पाहिजे, अशी बतावणी त्याने केली. त्यामुळे आता लवकरच आपण लग्न गाठ बांधणार असं त्या तरुणीला वाटलं. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला.
मात्र, आता त्याने आपल्यासह होणाऱ्या बाळाला मान्य करण्यात नकार दिला आहे. शिवाय लग्न करण्यास ही त्याने नकार दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिस ठाणे गाठत, आरोपी निलेश विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून गाडगेनगर पोलिसांनी नीलेश खोब्रागडे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.