Ashok Kharat Case: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ते नाव म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात. स्वतःला 'कॅप्टन खरात' म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीचे राज्यातील बड्या नेत्यांसोबतचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरात हा केवळ एक ज्योतिषी किंवा बाबा नसून त्याच्या कारनाम्यांमुळे त्याला आता 'एपस्टीनचा बाप' अशी उपमा दिली जात आहे. खरातच्या मोबाईलमध्ये 56 पेक्षा जास्त आक्षेपार्ह क्लिप सापडल्याचा दावा केला जात असून, यामुळे अनेक बड्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
अशोक खरात आणि सात दिग्गज नेत्यांचे सात फोटो आता समोर आले आहेत. या फोटोंनी खरातचे राजकीय संबंध किती खोलवर होते, हे स्पष्ट केले आहे.
( नक्की वाचा : Shirdi News: कॅप्टन खरात प्रकरणात विखे पाटलांचा खळबळजनक खुलासा, अहिल्यानगर जिल्ह्यात अनेकांना फुटला घाम! )
एकनाथ शिंदे आणि अशोक खरात
भोंदूबाबा अशोक खरातचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे दोन फोटो समोर आले आहेत. असे सांगितले जाते की, शिंदे हे भविष्य विचारण्यासाठी खरातकडे जात असत. एका फोटोमध्ये खरात हा एकनाथ शिंदे यांचा शाल घालून सत्कार करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये शिंदे त्यांच्या पत्नीसह एका शिवमंदिरात पूजा करत आहेत.

या पूजेच्या वेळी मागे अशोक खरात उभा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या फोटोंमध्ये मंत्री दीपक केसरकर आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती आहे.
रुपाली चाकणकर आणि जयंत पाटील यांचा एकत्रित फोटो
खरात प्रकरणाच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे नाव वारंवार घेतले जात आहे. त्यांच्या व्हिडिओंची सीरिजच बाहेर आल्याची चर्चा आहे. दरम्यान, एका मंदिरातला फोटो समोर आला असून त्यात अशोक खरात, रुपाली चाकणकर आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील एका नंदीच्या शेजारी उभे असलेले दिसत आहेत. या फोटोमुळे खरातचे संबंध केवळ एकाच गटापुरते मर्यादित नव्हते, हे उघड झाले आहे.

ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि खरात
खरातचे धागेदोरे ठाकरे गटापर्यंतही पोहोचले आहेत. मिलिंद नार्वेकर आणि खरात यांची भेट साधारण २० वर्षांपूर्वी नाशिक दौऱ्यादरम्यान झाली होती. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ही भेट घडवून आणल्याचे सांगण्यात येते. त्यानंतरही दोन ते तीन वेळा या दोघांच्या भेटी झाल्याचे फोटो आता समोर येत आहेत.

खासदार निलेश लंके यांच्यासोबतचा फोटो
अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांचाही अशोक खरातसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात निलेश लंके हे खरातचा हार घालून सत्कार करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे याही वेळी रुपाली चाकणकर तिथे उपस्थित होत्या.

सुनील तटकरे यांचा संताप आणि प्रफुल्ल पटेलांचे संकेत
अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हजेरी लावली होती. जेव्हा या प्रकरणावरून तटकरेंना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते चांगलेच संतापले. मात्र, दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर या प्रकरणी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे पक्षातही अस्वस्थता असल्याचे दिसून येते.

संजय राऊत यांचा '9 मंत्र्यांवर' निशाणा
या संपूर्ण प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "राज्यातील 9 मंत्री या भोंदू बाबाचे भक्त होते," असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. खरातच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या आक्षेपार्ह क्लिपमुळे काही मंत्री इतके तणावात आहेत की त्यांना आयसीयूमध्ये भरती करावे लागेल, अशी जहरी टीकाही राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील हा 'एपस्टीन' प्रकार नेमका कोणाकोणाला अडचणीत आणणार, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. सात नेत्यांचे फोटो तर समोर आले आहेत, पण खरातच्या मोबाईलमधील 'त्या' 56 क्लिप्समध्ये अजून कोणाचे चेहरे आहेत, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world