सुनील दवंगे, प्रतिनिधी
Ashok Kharat Shirdi Property News : महिलांवर अत्याचार केल्याच्या गंभीर गुन्ह्यात नाशिक क्राईम ब्रँचने आरोपी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन'खरातच्या मुसक्या आवळल्या आहेत. खरातला अटक केल्यानंतर दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि अश्लील व्हिडिओंच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या खरातची शिर्डी आणि परिसरातील कोट्यवधींची मालमत्ता आता चर्चेचा विषय बनली आहे. निघोज परिसरात तब्बल 50 कोटी रुपये किमतीचा 4 एकरचा भूखंड,त्यानंतर आता आणखी दोन प्राईम लोकेशनवरील भूखंडाबाबत माहिती समोर आल्याने खरातच्या संपत्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील पानमळा भागात जवळपास 30 गुंठ्यांचा प्राईम भूखंड खरातच्या पत्नीच्या नावावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय निमगाव परिसरात सव्वा एकराचा समायिक भूखंड अशोक खरातच्या नावावर असल्याची माहितीही पुढे आली आहे. याआधी समोर आलेल्या निघोजमधील 4 एकरच्या भूखंडासह विचार केला,तर खरात कुटुंबीयांच्या मालकीची जवळपास 240 गुंठे, म्हणजेच जवळपास 6 एकर जमीन असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ही सर्व जमीन शिर्डी आणि परिसरातील प्राईम लोकेशनमध्ये असल्याने तिची एकूण किंमत 60 ते 70 कोट्यवधींमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तपासादरम्यान सापडले 58 धक्कादायक व्हिडीओ
दरम्यान, नाशिक गुन्हे शाखेने खरातला अटक केल्यानंतर तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. पोलिसांनी खरातच्या पेन ड्राईव्हमधून 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींशी संबंधित बाबी असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका गुन्ह्यापुरती मर्यादित नसून, त्यामागे मोठं रॅकेट किंवा प्रभावशाली कनेक्शन असण्याची शक्यता आहे. जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून, त्यातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नक्की वाचा >> Nashik News: मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीसोबत घडला विचित्र प्रकार, पेपर सुरु असताना वर्गात काय घडलं?
यातील सर्वात संशयास्पद बाब म्हणजे,नाशिक गुन्हे शाखेने खरातला बेड्या ठोकण्यापूर्वीच शिर्डीतील त्याच्या मालकीच्या भूखंडावरील गव्हाची काढणी घाईगडबडीत उरकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.शेतातील गहू कापून तो तातडीने हलवण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांच्या कारवाईची कुणकुण खरातला आधीच लागली होती का?अटकेपूर्वी मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा,पुरावे नष्ट करण्याचा किंवा संशयास्पद वस्तू हलवण्याचा प्रयत्न झाला होता का? या सर्व मुद्द्यांचा आता तपास यंत्रणेत समोर येईल.
सिन्नर,शिर्डी आणि कोपरगाव परिसरातही खरातची संपत्ती
केवळ शिर्डीच नव्हे,तर सिन्नर,शिर्डी आणि कोपरगाव परिसरातही खरातने मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जमवल्याची चर्चा आहे. एका सामान्य ज्योतिषाकडे एवढी प्रचंड संपत्ती आली कुठून? हा प्रश्न आता सर्वसामान्यांसह तपास यंत्रणांनाही पडला आहे. महिलांचं शोषण,फसवणुकीतून आणि आर्थिक ब्लॅकमेलिंगमधून मिळालेल्या पैशातून ही संपत्ती उभी राहिली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता नाशिक गुन्हे शाखा खरातच्या सर्व बँक खात्यांची, आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करत आहे. अशोक खरात प्रकरण आता केवळ लैंगिक अत्याचारापुरतं मर्यादित न राहता, कोट्यवधींच्या संशयास्पद संपत्ती, ब्लॅकमेलिंग आणि संघटित फसवणुकीच्या मोठ्या गुन्हेगारी जाळ्याचा उलगडा करणारे प्रकरण ठरू शकते.