ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर गुन्हेगार मग समोरचा व्यक्ती कोण आहे हे ही पाहात नाही. अगदी न्यायाधिश, पोलीस, राजकारणी यांनाही हे सायबर गुन्हेगार नकळत गंडा घालतात. असा एक प्रयत्न सायबर गुन्हेगारांनी केला. यावेळी त्यांचे लक्ष होते एक केंद्रीय मंत्री. पण हा केंद्रीय मंत्री त्यांचाच बाप निघाला आणि त्यांचा सर्व डावच उधळला. हा संपुर्ण प्रकार शिर्डीत समोर आला आहे. अपघात झाला आहे पैसे पाठवा, असं या ठगाने सांगितले पण मंत्री महोदयांच्या सतर्कतेने त्याच्या या डावावरच पाणी फेरले गेले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्या केंद्रीय मंत्र्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न झाला ते आहेत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. आठवले हे बिहारच्या दौऱ्यावर होते. त्याच वेळी त्यांना एक फोन आला. त्यावरून बोलणारा व्यक्ती घाबरल्या सारखं बोलत होता. त्याने सांगितले आम्ही विद्यार्थ्यांची सहल घेवून निघालो आहोत. शिर्डीहून सहल गोंदीया जवळ पोहोचली आहे. तिथे आमच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यामुळे तातडीने आम्हाला पैसे पाठवा. हे पैसे ऑनलाईन पाठवा असं ही सांगण्यात आलं. आठवले हे त्यावेळी बिहारमध्ये होते.
पैशांची थेट मागणी केल्याने रामदास आठवले यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी तातडीने शिर्डीत प्रशासनाबरोबर संपर्क साधला. शिवाय शिर्डीहून गोंदीयाच्या दिशेने कोणती विद्यार्थ्यांची सहल गेली आहे का याची ही विचारणा केली. मात्र अशी कोणतीही सहल शिर्डीहून गेलेली नाही अशी माहिती त्यांना देण्यात आली. नंतर हा सर्व फसवणूकीचा प्रकार असल्याचं उघड झालं. शिर्डीत आल्यानंतर रामदास आठवले यांनी आपल्याबरोबर झालेला हा प्रकार सांगितला. शिवाय त्याचा डाव ही सतर्कतेमुळे कसा उधळून लावला हे पण सांगितलं.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत आम्हाला जागा मिळाव्यात अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. जर आम्हाला जागा मिळाल्या नाही तर आमची स्वतंत्र लढण्याची तयारी आहे, असंही ते म्हणाले. विधानसभेत आमच्या पक्षाला न्याय मिळाला नाही. महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळत नाही, तो मिळावा अशी आमची मागणी आहे असं म्हणत त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला जागा मिळाल्या नाहीत तर आमचा मार्ग वेगळा असेल असं ही ते म्हणाले.