वाल्मीक कराडचे पाय आणखी खोलात चालले आहेत. त्याला मकोका लावण्यात आला आहे. खंडणीच्या गुन्ह्यात तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिकचा सहभाग होता की नाही याची चौकशी पोलिस करत आहेत. वाल्मीकचा बीडमध्ये मोठ्या प्रमाणात वचक होता. पोलीस यंत्रणाही त्याच्या हातात होती असा आरोप होत होता. तो सांगेल ती पुर्व दिशा अशी स्थिती होती. ती गोष्टी सिद्ध करणारी एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही ऑडिओ क्लिप ट्वीट केली आहे. त्यात वाल्मीक कराड बीडच्या पोलिस निरिक्षकालाच आदेश देत आहे. या ऑडिओ क्लिपने एकच खळबळ उडाली आहे. मात्र ही फेक क्लिप असल्याचं संबधित पोलिस निरिक्षकाने म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
बीडमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे ती वाल्मीक कराडच्या एका ऑडिओ क्लिपने. वाल्मीक कराड पोलीस कोठडीत असताना ज्या बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत होता, त्या पोलीस ठाण्यात शितलकुमार बल्लाळ हे पोलिस निरिक्षक आहे. त्यांच्या बरोबरच बोलतानाची एक ओडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या क्लिपमध्ये कराड हा बल्लाळ यांना थेट आदेश देत आहे. शिवाय जो गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई करू नका असंही सांगत आहे. माझं नाव एसपींना सांगा असंही तो यात बोलताना दिसतोय.
यामध्ये वाल्मीक कराड हा सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका असे बल्लाळ यांना सांगत असल्याचा संवाद आहेत. यावर बल्लाळ हे त्याची शिफारस करू नका. तुम्ही एसपी साहेबांना बोला असे म्हणताना दिसत आहेत. ते आपलचं पोरगं आहे. मी एसपी साहेबांना बोलतो. माझ्यावर विश्वास ठेवून मदत करा. असं वाल्मीक त्यांना सांगतो. त्यावर ओके अण्णा असं बल्लाळ बोलत आहेत. दरम्यान याच सनी आठवले व त्याच्या साथीदारावर आता मकोका अंतर्गत कारवाई होण्याचे संकेत आहेत. अशावेळी बल्लाळ व वाल्मीक कराड यांची क्लिप व्हायरल झाल्याने त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. शिवाय याच पोलीस ठाण्यात कराडला आणले गेले होते. त्यामुळे त्याला कशी वागणूक दिली गेली असेल याचीही चर्चा आता रंगू लागली आहे.
दरम्यान याबाबत बीडचे पोलीस निरिक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ती फेक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संभाषण ही खोटं असल्याचं ते म्हणाले आहेत. या बाबत आपण सायबर विभागाकडे तक्रार करणार असल्याचं ही ते म्हणाले आहेत. त्यातून या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळली जाईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं. या क्लिपचा सोर्स काय आहे ते ही आपण तपासत आहे. सत्य काय आहे ते आपण उघडकीस आणू असंही त्यांनी सांगितलं. आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाल्याचंही ते म्हणाले. स्वत:च्या फायद्यासाठी अशा क्लिप तयार केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र या क्लिपमुळे बल्लाळ यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.