Akshay Shinde Encounter नंतर हैदराबादमधील प्रकरण चर्चेत, 5 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचं पोलिसांनी एन्काऊन्टर केलं. याबाबत आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांना अक्षय शिंदे याची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती. तळोजा तुरुंगातून त्याला ठाणे पोलीस घेऊन जात होते. मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केला असे म्हटले जात आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या ज्यात त्याचा मृत्यू झाला. अक्षयच्या एन्काऊन्टर प्रकरणानंतर पाच वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये घडलेलं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.

हैदराबादमध्ये काय घडलं होतं?

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डिसेंबर 2019 मध्ये एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चार आरोपींचा पोलिसांनी एन्काऊन्टर केला. या आरोपींनी 28 नोव्हेंबर रोजी महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकलं.या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. आरोपींना कठोऱ शिक्षा देण्याची मागणी होत होती.

पोलिसांनी चारही आरोपींना अटक केलं. त्यानंतर मध्यरात्री घटनास्थळावर नेऊन घडलेल्या प्रकारचं रिक्रिएशन करण्याचं ठरवलं. त्यावेळी एका आरोपीनं पोलिसांचं हत्यार हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सर्व आरोपी ठार झाले. आमच्याजवळ कोणताही दुसरा पर्याय नव्हता, असा दावा पोलिसांनी केला.

हैदराबादमध्ये झालेल्या एन्काऊन्टरचं सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. पण, त्याचबरोबर मानवी हक्क संघटनांनी या एन्काऊन्टरवर संशय व्यक्त केला होता. हैदराबाद शहर पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न विचारले होते. 

( नक्की वाचा : बदलापुरचा आरोपी अक्षय शिंदेचा कळव्यात The End, रिमांडमध्ये नेताना नेमकं काय घडलं?  )
 

सीबीआय चौकशीची मागणी

शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अक्षयच्या दोन्ही हातामध्ये बेड्या होत्या. त्यानंतरही त्यानं रिव्हॉलव्हर कसं हिसकावून घेतलं? हा प्रश्न अंधारे यांनी विचारला. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका करत सीबीआय चौकशीची मागणी केली. तर, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.