Badlapur School Crime : SIT तपासावर हायकोर्टाची नाराजी, प्रशासनाला दिला मोठा आदेश

Badlapur School Crime : बदलापूरच्या शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील तपासावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

बदलापूरच्या शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील तपासावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  'बेटा पढाओ बेटी बचाओ', अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे, असं कोर्टानं या सुनावणीच्या दरम्यान सुनावलं. बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टानं दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'बेटा पढाओ बेटी बचाओ'

बदलापूर प्रकरणानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने, सुनावणी दरम्यान, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करावी, अशी सूचना केली होती. या समितीसाठी तीन सदस्यांची नावं हायकोर्टानं मंगळवारी झालेल्या सुनावणीत सांगितली. 

निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव किंवा डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्यासह निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांच्या नावांचा या समितीसाठी विचार करावा, अशी सूचना हायकोर्टानं प्रशासनाला केली. राज्यस्तरीय समिती स्थापन करून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या एकंदरीत सुरक्षेबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टाकनं दिले आहेत.  'बेटा पढाओ बेटी बचाओ' परिस्थिती आता निर्माण झाली आहे, असं मत हायकोर्टानं या सुनावणीच्या दरम्यान व्यक्त केलं.

( नक्की वाचा : धक्कादायक ! बदलापूरच्या 'त्या' शाळेतील 15 दिवसांचं CCTV फुटेज गायब, शिक्षणमंत्र्यांची माहिती )
 

2 आरोपी अद्याप फरार

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. पण, ज्या शाळेत हा प्रकार घडला त्याचे संस्थाचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे अद्याप फरार आहेत. गुन्हा दाखल झालेले दोन आरोपी अद्याप फरार असल्यानं एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासावर हायकोर्टाची नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
 

Advertisement