Bail Pola 2025 : आज बैलपोळ्याच्या सणानिमित्ताने राज्यातील तीन ठिकाणांहून दु:खद घटना समोर आल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील खोळद गावात पोळा सणाच्या दिवशी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बैलांना चारण्यासाठी आणि अंघोळ घालण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय शंतनू मानकर याचा पिढी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला आहे.
आज सकाळी शंतनू आपल्या बैलांना घेऊन पिढी नदीकाठी गेला होता. पोळा सणानिमित्त बैलांची देखभाल करण्यासाठी तो नदीकाठावर गेला असताना अचानक आलेल्या पुरामुळे पाण्याचा जोर वाढला आणि शंतनू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. प्रशासनाच्या तत्परतेमुळे शोधमोहीम राबवून त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून खोळद गावात शोककळा पसरली आहे.
बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात शेतकऱ्याची आत्महत्या
चंद्रपुरातील या गावात बैलपोळ्याच्या सणाला स्मशान शांतता पसरली आहे. बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतात कीटकनाशक औषध प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यातील अडेगांवात घडली आहे. गणपत भाऊजी नागापुरे असे मृत शेतकऱ्याचं नाव आहे.नागापुरे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. दरवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे त्यांचा शेतीचे मोठे नुकसान होत असतं. यावर्षी त्यांनी तीन एकरमध्ये कापूस, धान पेरले. यंदा तरी चांगलं उत्पन्न मिळेल असा त्यांना विश्वास होता. मात्र वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे त्यांची शेती पाण्याखाली आली.
बैलपोळ्यासाठी आश्रमशाळेतून सुट्टीवर आलेल्या लहानग्याचा बुडून मृत्यू
बैलपोळ्याच्या सणासाठी आश्रमशाळेतून सुट्टीवर आलेल्या 5 वर्षीय लहानग्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील कोयार गावात ही दु:खद घटना घडली आहे. रिशान प्रकाश पुंगाटी असं मृत मुलाचं नाव आहे. तो लाहेरी येथील आश्रम शाळेतील पहिल्या इयत्तेत शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी वडील प्रकाश पुंगाटी यांनी रिशानला लाहेरी येथील आश्रमशाळेतून घरी आणले होते. रिशान घरी आल्यावर लगेचच गावाजवळ असलेल्या नाल्यात अंघोळ करण्यासाठी गेला. त्याच वेळी ही दुर्दैवी घटना घडली. नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.