Beed News: बीडमध्ये भर मंडपातून नवरदेव पळाला; पोलिसांची धाड पडताच पाहुण्यांची उडाली दाणादाण

Beed Child Marriage News:  पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच विवाहाचे विधी पार पडले होते. पोलिसांचे पथक दारात उभे असलेले पाहताच नवरदेवाला घाम फुटला

जाहिरात
Read Time: 2 mins
Beed News : या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 100 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
बीड:

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed Child Marriage News:  बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे बालविवाहाची एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांच्या धाडीनंतर नवरदेवाने मंडपातूनच पळ काढला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून कायद्याची भीती नसलेल्या वऱ्हाडी मंडळींचे कृत्य चव्हाट्यावर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 100 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांना पाहताच नवरदेवाची पळापळ

बीड जवळ असलेल्या कपिलधार येथील एका प्रसिद्ध मंगल कार्यालयात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सामाजिक कार्यकर्ते आणि बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने संबंधित कार्यालयात धाड टाकली. 

मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच विवाहाचे विधी पार पडले होते. पोलिसांचे पथक दारात उभे असलेले पाहताच नवरदेवाला घाम फुटला आणि त्याने थेट लग्नाच्या मंडपातून पळ काढला. भर मंडपातून नवरदेव पळून गेल्याने उपस्थित पाहुण्यांची आणि वऱ्हाडींची मोठी धावपळ उडाली. या संपूर्ण थराराचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

( नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! भररस्त्यात तरुणीसोबत 15 मिनिटं भयंकर कृत्य,पाहा धक्कादायक VIDEO )
 

तब्बल 100 जणांविरोधात गुन्हा दाखल

या बेकायदेशीर विवाह सोहळ्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. केवळ वधू-वराचे आई-वडीलच नव्हे, तर या सोहळ्याला उपस्थित राहिलेले जवळचे नातेवाईक, वऱ्हाडी मंडळी आणि ज्या देवस्थानच्या जागेत हा विवाह झाला त्या कपिलधार देवस्थानचे विश्वस्त अशा एकूण 100 जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

Advertisement

मंगल कार्यालय बुक करून आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत होता, ही बाब तपासात स्पष्ट झाली आहे. मुलीचे वय लग्नासाठी कायदेशीररीत्या कमी असतानाही हा विवाह लावला जात असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

( नक्की वाचा : Eknath Shinde: पुष्पगुच्छ नको आणि सोहळेही नको! शिंदेंनी वाढदिवसाबाबत घेतला 'हा' कठोर निर्णय, कारण काय? )

बालविवाहाचे मोठे आव्हान

बीड जिल्ह्यामध्ये बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि विविध सामाजिक संस्था सातत्याने जनजागृती करत आहेत. मात्र तरीही छुप्या पद्धतीने किंवा अशा प्रकारे उघडपणे बालविवाह लावले जात असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तिथून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. 

Advertisement

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. सध्या फरार असलेल्या नवरदेवाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
 

Topics mentioned in this article