बीड: परळीच्या टोकवाडी परिसरात लिंबोटा येथील रहिवासी असलेल्या शिवराज दिवटे याला दोन दिवसापूर्वी अमानुष मारहाण झाली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सात आरोपीला अटक केली. त्यानंतर मात्र बीडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. आता याच प्रकरणातील दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, शिवराज दिवटे याच्या मित्रांनी परळी शहरातील समाधान मुंडे याला मारहाण केली होती. 16 मे रोजी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ही मारहाण झाली. त्यानंतर समाधान मुंडे याच्या मित्रांनी मिळून शिवराज दिवटे याला टोकवाडी परिसरात अमानुष मारहाण केली. समाधान मुंडे याला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरातील तरुणांमधील किरकोळ वाद किती टोकाला पोहोचलाय याची प्रचिती येते.
शिवराज दिवटे याचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जातीय समीकरण समोर आले होते. मात्र सदर मारहाण जातीय द्वेषातून नव्हे तर किरकोळ वादातून झाल्याचे तरी प्राथमिक पाहायला मिळते. या व्हिडिओनंतर शिवराज दिवटे याच्यासह त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
नक्की वाचा - Shirdi News : भारत-पाकिस्तान युद्धाच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक, साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार
दुसरीकडे, परळीतील मारहाणीच्या दोन घटना ताज्याच असताना पुन्हा एका अमानुष मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. परळीतील योगीराज गित्ते या तरुणाला चार जणांच्या टोळक्याकडून मारहाण होतेय. मारहाण करत असताना त्याचेही व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दृश्यात दिसणारा हाच तो आरोपी आदित्य गित्ते आहे, त्याच्यासह टोळक्याने ही मारहाण केली आहे. घटना पाच महिन्यापूर्वीची असल्याचे समजते. या व्हिडिओनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशत माजली आहे.