राज्यभरात चर्चेत असलेल्या बीडच्या मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं ज्या ठिकाणाहून अपहरण करण्यात आलं होतं, त्याच ठिकाणाहून 28 मे 2024 रोजी आवादाचा कंपनीच्या मॅनेजरचे 2 कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रमेश घुले नावाच्या आरोपीने गावठी कट्ट्याचा धाक दाखवून शिंदे यांचं अपहरण केलं होतं. अपहरण केल्यावर एका हॉटेलमध्ये शटर बंद करून काम बंद करण्याची धमकी देखील दिली होती. शिवाय जमीन अधिग्रहण करणाऱ्या अधिकाऱ्यांना नगर जिल्ह्यातील भगवानगडाजवळही बोलवलं आणि त्यांच्याकडे दोन कोटींची मागणी केली होती.
नक्की वाचा - Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या! 'तो' निर्णय वादाच्या भोवऱ्यात; नागपूर खंडपीठाचा सरकारला सवाल
पण त्यावेळी पोलिसांची गाडी आल्यानंतर अधिकाऱ्यांची सुटका झाली होती. अन्यथा त्यावेळी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखा प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी रमेश घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर त्या भागात देखील वावरत होता अशी माहिती मिळत आहे.
धनंजय मुंडे यांनीच वाल्मीक कराडला भेटण्याचा सल्ला दिला...
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर वाल्मीक कराड राज्यात नव्हे तर देशात चर्चेत आला. याच वाल्मीक कराडचे दिवसेंदिवस नवे कारनामे आता उघड होऊ लागले आहेत. वाल्मीक कराड वर विविध आरोप होत असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या ऊस तोडणी यंत्राच्या सबसिडी पोटी करोडो रुपये उखळल्याचा आरोप ही त्याच्यावर होत आहे. बारामती तालुक्यातील रामचंद्र भोसले यांच्यासह अन्य ठिकाणच्या 140 ऊस तोडणी यंत्र चालकांकडून वाल्मीकने प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले. असा आरोप शेतकरी करत आहेत. परळीमधील अनुसया लॉजवर वाल्मीक कराडने ही रक्कम स्विकारली होती असं ही शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व शेतकरी धनंजय मुंडे यांना भेटले होते. धनंजय मुंडे यांनीच वाल्मीक कराडला भेटण्याचा सल्ला दिला होता असा आरोप रामचंद्र भोसले या शेतकऱ्याने केला आहे. फसवणूक झालेल्या या शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची बारामतीत भेट घेतली. सुळेंसमोर या शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. सुळेंनी प्रकरण समजून घेत पुण्याच्या एसपींना फोन लावला. आता पुणे एसपी यांनी या शेतकऱ्यांना बैठकीला बोलावलं आहे. ते या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतली. त्यानंतर किती पैसे लुटले आहेत याचीही ते माहिती घेतली. या प्रकरणामुळे वाल्मीकचे कारनामे बीड नाही तर बीडच्या बाहेरही सुरू होते हे आता स्पष्ट झालं आहे.