- महाराष्ट्रातील २५ तरुणांना थायलंड आणि म्यानमारमध्ये चांगल्या नोकरीचे आमिष दाखवण्यात आलं
- पीडित तरुणांना बंदुकीच्या धाकावर दिवसाला १८ ते १९ तास ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतलं जात आहे
- काम न केल्यास मारहाण, विजेचे शॉक आणि अमानुष छळ केल्याचे या तरुणाने फोनवरून सांगितले आहे
आकाश सावंत
परदेशात नोकरीला जावं असं प्रत्येक तरुणाला वाटतं. त्यातून ते परदेशात सहज नोकरी कशी मिळेल याचा शोध घेत असतात. यातूनच अनेक तरुण अवैध मार्गाचा अवलंब करतात. मग कुणी डंकीने परदेशात प्रवेश करण्याचा ही प्रयत्न करत असतात. त्यात फार थोड्या तरुणांना यश येत तर बरेच जण या गोष्टीत वाईट पद्धतीने फसतात. परदेशात मोठ्या पगाराची नोकरी सोडा दोन वेळ खाण्याचे ही आभाळ होते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास 25 तरुणांना थायलंडमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. असं सांगून त्यांना नेण्यात आले पण त्यांच्या सोबत सध्या भयंकर प्रकार सुरू आहे.
मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष महाराष्ट्रातील 25 तरुणांना दाखवण्यात आले. कुणाला थायलंड तर कुणाला म्यानमारमध्ये नोकरी असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या 25 जणांना म्यानमार-थायलंड सीमेवरील कुख्यात 'गोल्डन ट्रँगल' परिसरात ओलिस ठेवण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार बीडच्या एका तरुणामुळे समोर आला आहे. त्या तरुणाने डेअरिंग करून एक फोन केला. त्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे. म्यानमार, थायलंड आणि लाओस या देशांच्या सीमा जिथे मिळतात, त्या भागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर 'गोल्डन ट्रँगल' म्हटले जाते.
त्या ठिकाणीच या सर्व तरूणांना किडनॅप करण्यात आले आहे. बीडमधील एका तरुणाच्या धक्कादायक फोनमुळे मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पीडित तरुणांच्या माहितीनुसार, बंदुकीच्या धाकावर त्यांच्याकडून दिवसाचे 18 ते 19 तास ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतले जात आहे. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण, विजेचे शॉक आणि अमानुष छळ केला जात असल्याचे गंभीर वास्तव या तरुणाने फोन वरून सांगितले आहे. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग होता.
या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय त्यांना ही या प्रकारामुळे धक्का बसला आहे. त्यांनी तातडीने परराष्ट्र मंत्रालयाशी याबाबत संपर्क साधला आहे. अडकलेल्या सर्व तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक तरूण या आमिषांना बळी पडतात. त्यातून त्यांची पिळवणूक होत आहे. तिथून आपण घरी सुखरूप येवू की नाही याची भिती या तरुणांच्या मनात आहे. या आधी ही याच भागत तरुणांना अशा प्रकारे कामं करून घेतली जात होती.