Beed News: बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! तरुणाचे अपहरण करुन जबर मारहाण, नव्या VIDEO ने जिल्हा हादरला

बीडमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत,  बीड: संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. बीड जिल्ह्यामधील मारहाणीचे व्हिडिओ अन् गावगुंडांच्या दहशतीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. एकीकडे बीडचे नवे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करत असतानाच बीडमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्व.सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतरही बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे. बीडच्या परळीमध्ये एका तरुणाचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बेदम मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  शिवराज दिवटे असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून आज सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे या तरूणाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत शिवराज दिवटे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला परळी येथून अंबाजोगाईच्या स्वराची रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नक्की वाचा: तुरुंगातल्या आरोपीने सुचवले संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे नाव

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये 7 ते आठ तरुण  शिवराज दिवटे याला लाकडी काठ्या, दांडक्याने बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तसेच या मारहाणीचा व्हि़डिओ करण्यात आला असून तो समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. अतिशय निर्घृण आणि अमानुष मारहाण होता असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या संतापजनक प्रकारानंतर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे.

 नक्की वाचा : Shirdi News : भारत-पाकिस्तान युद्धाच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक, साईंच्या शिर्डीतील धक्कादायक प्रकार )


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world