- भंडारा जिल्ह्यात नवजात बालिकेच्या विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे
- रॅकेटचा मुख्य सूत्रधार गोंदिया येथील एक नामांकित डॉक्टर असून तो फरार आहे,
- नवजात बालिका दहा दिवसांची असून तिला उपचारासाठी नागपूरला पाठवण्याचा बनाव करण्यात आला
अभय भुते
नवजात बालिकेच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने दहा दिवसांच्या चिमुकलीला उपचारासाठी नागपूरला पाठवत असल्याचे सांगून तिची तब्बल अडीच लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार गोंदिया येथील एक नामांकित डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपी डॉक्टर मात्र फरार आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर भांडारा जिल्ह्याच एकच खळबळ उडाली आहे.
चित्रपटात पाहायला मिळणारा मुलांच्या विक्रीचा प्रकार आता थेट भंडारा जिल्ह्यात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पांढराबोडी येथील मालती प्रकाश वाघमारे हिच्या घरी दहा दिवसांची नवजात बालिका असल्याची माहिती मिळाली होती. 2 फेब्रुवारी रोजी महिला व बालकल्याण विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर अज्ञात व्यक्तीने ही माहिती दिली. माहिती मिळताच जिल्हा समन्वयक आणि कर्मचाऱ्यांचे पथक वाघमारे यांच्या घरी पोहोचले. तेथे नवजात बालिका आढळून आली. ही मुलगी गोंदिया येथून आणल्याचे मालतीने सांगितले.
तिला अधिक चौकशीसाठी 3 फेब्रुवारी रोजी भंडारा येथील महिला व बालकल्याण कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र ती उपस्थित राहिली नाही. या नंतर चाइल्ड हेल्पलाइनच्या समन्वयकांनी संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. वरठी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ पांढराबोडी येथे दाखल झाले. मात्र तोपर्यंत संबंधित महिला बालिकेला घेऊन चारचाकी वाहनातून पसार झाली होती. पोलिसांनी नाकाबंदी करून कुशारी फाटा येथे संशयित वाहन अडवले. वाहनात महिला आणि दहा दिवसांची चिमुकली आढळून आली.
बालिकेच्या अधिकृत माता-पित्यांबाबत किंवा आवश्यक कागदपत्रांबाबत समाधानकारक माहिती देण्यात ती अपयशी ठरली. गोंदिया येथील एका डॉक्टरांच्या सांगण्यावरून मुलीला गोंदियाला घेऊन जात असल्याचे तिने कबूल केले. तपासात ही धक्कादायक बाब समोर आली. संबंधित दाम्पत्याला मुलगी अशक्त असल्याचे सांगून उपचारासाठी नागपूरला पाठवण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्याच वेळी गोंदिया येथील टोळीने या नवजात बालिकेची अडीच लाख रुपयांत विक्री केल्याचे उघड झाले. अशी माहिती बाल संरक्षण अधिकारी नितीनकुमार साठवणे यांनी दिली.
या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. तर या विषयी पोलिसांनी सद्या बोलण्यास नकार दिला असून या मागे आणखी किती मोठं रॅकेट आहे, याचा खुलासा झाल्यावर पोलीस आपली भूमीका मांडणार आहेत. विशेष म्हणजे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला गोंदिया येथील नामांकित डॉक्टर सध्या फरार आहे. डॉक्टर अटकेत आल्यानंतर हा प्रकार एका बालिकेपुरताच मर्यादित आहे की यामागे आणखी मोठे रॅकेट कार्यरत आहे, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. सध्या या घटनेमुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून नवजात बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world