भीमा नदी पात्रातील दुर्घटनेचा आज तिसरा दिवस आहे. 36 तास ओलांडल्यानंतर पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप एका व्यक्तीचा मृतदेह सापडलेला नाही. त्यामुळे अजूनही NDRF च्या टीमकडून शोधमोहीम सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी इंदापूरातून कळाशीच्या दिशेने जाणारी बोट बुडाली होती. जोरदार वारा सुटल्याने ही बोट भीमा नदी पात्रात बुडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे पोहत नदी पात्राच्या बाहेर आल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र रात्री अंधारात शोध घेण्यात अडथळा येत असल्याने शोध थांबवण्यात आला. बुधवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यादरम्यान बुडालेली बोट सापडली होती. मात्र सहा जणांपैकी एकही जण सापडला नव्हता.
नक्की वाचा - भीमा नदीत बोट बुडाली; 'ते' सहाजणं अद्याप बेपत्ता, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोहत किनाऱ्यावर!
आज तब्बल 36 तासांच्या शोधमोहीमेनंतर पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र आणखी तिघांचे मृतदेह सापडले नसल्यामुळे NDRF च्या टीमकडून अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. काल दिवसभर एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहीम राबवली मात्र शोध कार्यात अडचणी येत असल्याने रात्री सहा वाजता ही मोहीम थांबवण्यात आली. आज सकाळी सात वाजल्यापासून हे सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. सापडलेल्या पाचपैकी एक महिला, दोन लहान मुलं, दोन पुरुष यांचे मृतदेह सापडले आहेत.
गेल्या 36 तासापासून भीमा नदी पात्रात बेपत्ता असलेल्या सहा पैकी पाच व्यक्तींचे मृतदेह हाती आले आहेत. त्या पाच मृतदेहांपैकी तिघांची ओळख पटली आहे. यामध्ये कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3 वर्षे) यांचे मृतदेह हाती लागले आहेत. हे सर्व करमाळा तालुक्यातील झरे गावचे रहिवासी आहेत. पाच पैकी इतर दोघांची ओळख पटवणे बाकी आहे. सहा पैकी आणखी एकाचा शोध सुरु आहे.