Rajasthan News : पोलिसांनी एका 20 वर्षांच्या मुलीचा फोटो शेअर करून तरुणांना अलर्ट केलं आहे. या फोटोमध्ये मुलीने साडी नेसली आहे आणि डोक्यावरुन पदरही घेतला आहे. या मुलीचं नाव मुस्कान असून हनिट्रॅप प्रकरणात राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून तिला अटक करण्यात आली आहे.
मुस्कानची मोठी गँग आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या गँगमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून मुस्कान कायम आपली ठिकाणं बदलत राहते. त्यामुळे आतापर्यंत पोलीस तिला पकडू शकत नव्हते. मात्र एक टीप लागली आणि तिला पकडण्यात पोलिसांना यश आलं.
मुस्कान ही सीकर जिल्ह्यातील शास्त्री नगर भागात राहते. भरतपूरमध्ये राहणाऱ्या योगेश नावाच्या तरुणासोबत तिचा प्रेमविवाह झाला आहे. दोघांनी मंदिरात लग्न केलं. योगेश हा मजुरीचं काम करतो. आर्थिक चणचण असल्याने तिने हा गुन्हेगारीचा मार्ग अवलंबवला. तिने आपली गँग तयार केली आणि लोकांना हनिट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून पैसे उकळले. काही वेळापूर्वी जेव्हा एका व्यक्तीने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली, त्यावेळी या प्रकरणाचा खुलासा झाला.
नक्की वाचा - Palghar News : नवरात्रीचे उपवास अन् मुलांकडून चिकन लॉलीपॉपचा हट्ट; आईने केली मुलाची हत्या, मुलगी गंभीर जखमी
धोका, मारहाण, अश्लील व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंग...
हनिट्रॅप गँगचे सदस्य नेपाल गुर्जर उर्फ प्रमोद गुर्जर आणि विकास गुर्जर यांनी पीडित तरुणाला जागेचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावलं होतं. पीडित तरुण येताच आरोपीने त्याला जबरदस्तीने गाडीत बसवलं. त्याने पीडितेच्या कानवर बंदूक ठेवून धमकी दिली आणि मारहाण केली. गँगने पीडित तरुणाचा एका तरुणीसोबत अश्लील व्हिडिओ केला होता. यानंतर आरोपीने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैसे उकळले.
या पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र आरोपींचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. मुस्कान वारंवार जागा बदलत होती. ज्यामुळे तिचं लोकेशन शोधणं कठीण जात होते. मुस्कानला अटक केल्यानंतर पोलीस याचा तपास करीत आहे.