Bihar Police : बिहारमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने ई-रिक्षाचालकाला त्याची जात विचारून मारहाण केली आणि नंतर त्याला आपली थुंकी चाटायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शेखपुरा जिल्ह्यात मंगळवारी हा प्रकार घडला आहे. प्रदीप कुमार असं या पीडित रिक्षाचालकाचं नाव आहे. तो जिल्ह्यातल्या मेहूस गावात प्रवासी सोडून जात असताना हा सर्व प्रकार घडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
रिक्षाचालकाने दिलेल्या माहितीनुसार, तो एका चौकात असताना मेहुस पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रवीण चंद्र दिवाकर यांनी त्याला थांबवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दिवाकर हे दुचाकीवरून होते आणि त्यांनी साधे कपडे घातले होते, त्यामुळे सुरुवातीला ते पोलीस असल्याचे रिक्षाचालकाला ओळखता आले नाही. त्यांच्यात वाद झाल्यानंतर दिवाकर यांनी पोलिसांचे वाहन बोलावले आणि रिक्षाचालकाला अटक केली.
कुमारला पोलीस वाहनातून नेण्यापूर्वी, दिवाकरने त्याला रस्त्यावर किमान 50 ते 60 वेळा काठीने मारहाण केली, ज्यामुळे रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. त्या पोलिसाने रिक्षाचालकाने दारू प्यायल्याचा आरोप करण्याचाही प्रयत्न केला. पण त्याला कोणताही वास न आल्याने, दिवाकरने रिक्षाचालकाला खाली पाडले पोलीस स्टेशनला नेल्याचं सांगितलं. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर दिवाकरने त्याला आणखी शिवीगाळ केली आणि मारहाण केली.
( नक्की वाचा : Mumbai School : गोळ्या दिल्या, दारू पाजली; मुंबईतील बड्या शाळेच्या वासनांध शिक्षिकेचे भयंकर कृत्य )
त्यानंतर त्याने रिक्षाचालकाला त्याची जात विचारली. त्यावर कुमारने "ब्राह्मण" असे उत्तर दिले. ते एकताच पोलीस अधिकारी संतापले 'मला ब्राह्मण जातीचे लोक बघायलाही आवडत नाहीत,' असे म्हणून जमिनीवर थुंकले आणि रिक्षाचालकाला ती चाटायला लावली.
रिक्षाचालकाने या घटनेची माहिती स्थानिक आमदार सुदर्शन कुमार यांना दिली. कुमार यांनी स्थानिक लोकांनीही पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. रिक्षाचालक सध्या शेखपुरा सदर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
'मी रोज माझ्या कुटुंबासाठी कष्ट करतो. माझ्यासोबत जे घडले ते मी कधीही विसरू शकत नाही. माझी जात विचारल्याबद्दल मला मारहाण करण्यात आली, थुंकी चाटायला लावली. ही माणुसकी आहे का?" असे कुमार म्हणाले.
"चौकशीत आरोप खरे आढळल्यानंतर आम्ही त्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे," असे पोलीस अधीक्षक बलिराम चौधरी यांनी सांगितले.
दुसरीकडे, दिवाकरने त्याच्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर तो रिक्षाचालकच मुलींची छेड काढत होता, असा दावा केला आहे.