
Breaking Bad in Rajasthan: अमेरिकन मालिका 'ब्रेकिंग बॅड' प्रमाणेच घडलेल्या एका गुन्ह्यात, 2 शिक्षकांनी तब्बल 15 कोटींचं ड्रग्ज त्यांच्या फ्लॅटमध्ये बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) नं त्यांच्या फ्लॅटमध्ये टाकलेल्या छाप्यात हा सर्व प्रकार उघड झालाय. या प्रकरणात दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या दोन शिक्षकांना 15 कोटी रुपयांचे मेफेड्रोन (4-मिथाइलमेथकॅथिनोन) नावाचे अंमली पदार्थ तयार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक जण सरकारी शाळेत विज्ञानाचा शिक्षक आहे. तर दुसरा कोचिंग सेंटरमधील माजी भौतिकशास्त्र शिक्षक आहे.
MD हे कॅथिनोन कुटुंबातील एक सिंथेटिक उत्तेजक औषध आहे, जे सेवन केल्यावर लगेचच आनंदाची भावना देते, परंतु ते व्यसनकारक असून त्याचा सतत वापर केल्यास गंभीर मानसिक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
( नक्की वाचा: Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा )
या प्रकरणात मनोज भार्गव (25), जो गंगासागर जिल्ह्यातील मुकलवा येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत विज्ञान शिक्षक आहे आणि इंद्रजीत बिश्नोई, जो राजस्थान प्रशासकीय सेवा (RAS) चाही एक इच्छुक उमेदवार आहे, यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना श्री गंगानगर परिसरातील रिद्धी-सिद्धी एन्क्लेव्हमधील ड्रीम होम्स अपार्टमेंटमधील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमधून गेल्या अडीच महिन्यांपासून गुप्तपणे अंमली पदार्थ निर्मितीची प्रयोगशाळा चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
NCB संचालक (जोधपूर झोनल युनिट) घनश्याम सोनी यांनी सांगितले की, हे दोघे दिल्लीतून रसायने आणि उपकरणे मिळवत असत आणि MD औषध बनवण्यासाठी त्यांच्या नोकरीतून रजा घेत असत.
( नक्की वाचा : Viral Video : काकाच्या घरी नेलं, बेदम मारहाण आणि काकूशी लावलं जबरदस्तीनं लग्न! काय आहे प्रकार? )
गेल्या अडीच महिन्यांत या दोघांनी सुमारे 5 किलो MD औषध बनवले, ज्याची बाजारात किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. यापैकी त्यांनी 4.22 किलो औषध विकले. त्यांच्या फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात 780 ग्रॅम MD औषध आणि आधुनिक उपकरणे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या औषधाची किंमत 2.34 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, अशी माहिती सोनी यांनी दिली.
याशिवाय, एसीटोन, बेंझिन, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, ब्रोमाईन, मिथिलामाइन, आयसोप्रोपिल अल्कोहोल, 4-मिथाइल प्रोपिओफेनोन आणि एन-मिथाइल-2-पायरोलिडोन सारखी पूर्वगामी रसायनेही जप्त करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
सर्वात मोठी छापेमारी?
NCB नं राजस्थानमधील अंमली पदार्थ सिंडिकेटवर केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणातील ड्रग्ज खरेदीदारांचा तसंच या गुन्ह्यात सहभागी अन्य लोकांचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world