अमोल गावंडे, प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये गाय चोरीच्या संशयावरुन एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामधील आणखी एक धक्कादायक बातमी म्हणजे या तरुणाला धर्म विचारुन नग्न करत मारहाण करण्यात आली आहे.. सुदैवाने गस्तीवर असलेल्या पोलिस व्हॅनचा सायरन वाजला आणि हल्लेखोरांनी पळ काढला. रोहन पैठणकर असं या प्रकरणातल्या मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे.
रोहित पगारिया, गज्जू गुजरीवाल आणि प्रशांत सांगेल असं रोहनला मारहाण करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. यामधील गज्जू गुजरीवाल गेल्या वर्षाभरापासून तुरुंगात होता. त्याची महिनाभरापूर्वीच त्याची सुटका झाली होती, अशी माहिती आता उघड झालीय.
( नक्की वाचा : Amit Salunkhe: ॲम्बुलन्स घोटाळ्यातील आरोपी अमित साळुंखेचे महाराष्ट्र कनेक्शन! 12 हजार कोटींचं टेंडर देणारा आका कोण? )
रोहनला झालेल्या मारहाणीनंतर दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. खामगाव शहरात या संघटनांनी मोर्चा काढत प्रकरणाचा निषेध केला. धर्म विचारुन मारहाण करणं गंभीर असल्याचा संताप दलित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
रोहन पैठणकरला झालेल्या या अमानुष मारहाणीनंतर 28 जुलै रोजी वंचित आणि दलित संघटनांनी बंदची हाक दिलीय. आता या प्रकरणातील तिसऱ्या आरोपींच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.