वाढदिवशी गिफ्टऐवजी हातात आला साप; मित्रांचं सेलिब्रेशन पडलं महागात, तरूणाचा मृत्यू

Snake Bite : मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरा करणे एका सर्पमित्राला चांगलेच महागात पडले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बुलढाणा:

मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरा करणे एका सर्पमित्राला (Snake Friend) चांगलेच महागात पडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) चिखली तालुक्यात वाढदिवशी हातात विषारी साप घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने तरुणाचा साप चावल्याने मृत्यू झाला आहे. चिखली शहरातील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे नावाच्या तरुणाचा 5 जुलै रोजी वाढदिवस होता. पारंपरिक पद्धतीने घरात वाढदिवस साजरा केल्यानंतर मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरा करण्यासाठी शेजारील मित्र सर्पमित्र आरिफ खान रईस खान आणि धीरज पंडितकर यांनी संतोषला वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर नेले. येथेच त्याच्यासोबत घात झाला. 

मित्रांनी संतोषच्या हातावर विषारी साप दिला. यावेळी चिडलेल्या सापाने संतोष जगदाळेला जोरदार दंश केला. त्यातच त्याची प्रकृती बिघडली. यानंतर दोन्ही मित्रांनी त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचार पूर्ण न करता मित्रांनी रुग्णालयातून त्याचा डिस्चार्ज करून घेतला. त्यानंतर संतोषची प्रकृती अधिकच खालावली आणि त्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. संतोषच्या वडिलांनी याप्रकरणात चिखली शहर पोलीस स्टेशन गाठून संपूर्ण हकिकत कथन करत संतोषच्या हाती विषारी साप देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्पमित्र आरिफ खान रईस खान आणि धीरज पंडितकर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 3 (5) उपकलम पाच अन्वये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Advertisement

नक्की वाचा - BMW Hit And Run : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक

वाढदिवशी नेमकं काय घडलं?
ही घटना 5 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. चिखलीतील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे (31 वर्ष) याचा त्यादिवशी वाढदिवस होता. गजानन नगर येथील त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. संतोषचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून मित्रांनी संतोषला बाहेर आणले. यावेळी त्याचा मित्र आरिफ खान रहीस आणि धीरज पंडितकर हे देखील तिथे उपस्थित होते. आरिफ हा सर्पमित्र असून तो नेहमी विविध प्रकारचे साप वागवतो. संतोष जगदाळे याचा वाढदिवस साजरा करत असताना आरिफ व धीरजने त्यांच्या  जवळील विषारी साप संतोषच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. यात सर्पदंश झाल्याने संतोष अत्यवस्थ झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तरीही संतोषचा जीव वाचू शकला नाही. या धक्कादायक घटनेनंतर मृतक संतोष जगदाळे याच्या वडिलांनी आरिफ खान रहिस, धीरज पंडितकर (रा. गजानन नगर चिखली) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. दोघेही संतोषच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवतकर करीत आहेत.
 

Advertisement