- बुलढाणा जिल्ह्यातील क्षय आरोग्यधाम हॉस्पिटलमधील स्वयंपाकघरातून एक भरलेला गॅस सिलेंडर चोरीला गेला आहे
- चोरट्यांनी स्वयंपाकघराची खिडकी आणि दरवाज्याचा कडीकोंडा तोडून १७ सिलिंडरपैकी एक सिलिंडर लांबवला आहे
- चोरीत गॅस पाईपलाइन, तांब्याची ऑक्सिजन पाईपलाइन आणि दीड ते दोन लाख रुपयांचा मुद्देमालही गहाळ झाला आहे
अमोल सराफ
संपूर्ण देशभर गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे तारांबळ उडाली आहे. काही करून गॅस सिलिंडर मिळावा यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. कुणी ऑनलाईन बुकींग करत आहे तर कुणी थेट गॅस एजन्सीमध्ये जात आहेत. त्यामुळे सगळीकडे सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. या गोंधळात मात्र एका चोराने शांतीत क्रांती केल्याचे समोर आले आहे. त्याने चक्क एक हॉस्पिटलमधील गॅस सिलिंडर आणि त्याचे साहित्यच चोरून नेले आहे. बुलढाणा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्याच्या या कारनाम्याची चर्चा जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.
बुलढाणा शहरातील क्षय आरोग्यधाम (टीबी हॉस्पिटल) येथील स्वयंपाकघरातून भरलेला गॅस सिलेंडर चोरीला गेला आहे. त्या बरोबर इतर साहित्य ही चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी स्वयंपाकघराची खिडकी आणि दरवाज्याचा कडीकोंडा तोडून चोरी केली. त्यात त्याने 17 सिलिंडरपैकी एक भरलेला सिलिंडर लांबवला. त्याच बरोबर गॅस पाईपलाइन आणि तांब्याची ऑक्सिजन पाईपलाइन काढून नेली आहे.
असा एकूण दीड ते दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण यांनी NDTV मराठीशी बोलताना सांगितले, "जवळपास 60 ते 70 हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. यात एक भरलेला गॅस सिलेंडर, गॅस पाईप आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर पंचनामा होऊन कारवाई होईल. असं चव्हाण यांनी सांगितलं. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं ही ते म्हणाले. कुणी विचार करणार नाही अशी ही चोरी असल्याचं ते म्हणाले.
चोरट्यांनी गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर दवाखान्यांच्या गोडाऊनवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. ही घटना खळबळजनक असून, आता रुग्णालयेही सुरक्षित राहिली नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज आणि पुरावे तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गॅस तुटवडा आणि चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रशासनाने दवाखान्यांच्या सुरक्षितेवर भर द्यावा, अशी मागणी होत आहे. गॅसचा सध्याचा तुटवडा पाहाता या गोष्टी होत आहेत. जीथे संधी मिळेल तिथून गॅस मिळवण्याचा हा प्रयत्न दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world