Buldhana News :'तुझ्याशी थोडं बोलायचं आहे', लॉजमध्ये नेलं अन्... शेगावमध्ये तरुणीवर अमानुष अत्याचार

हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana News : दामिनी पथक प्रबोधनाच्या जनजागृतीनंतर महिलाच्या असुरक्षिततेचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. याचंच एक उदाहरण बुलढाण्यातील शेगाव येथून समोर आलं आहे.

शेगावात तरुणीवर अमानुष अत्याचार आरोपीविरुद्ध कठोर कलमांत गुन्हा दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात कायदा-सुव्यवस्थेला हादरा देणारी, समाजाला संतापून सोडणारी एक गंभीर गुन्हेगारी घटना उघडकीस आली आहे. शेगावात आलेल्या एका तरुणीवर विकृत आणि अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील युवकाविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. २ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० ते १.३० वाजेदरम्यान शेगावातील एका लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

'तुझ्याशी थोडं बोलायचं आहे...'

'तुझ्याशी थोडं बोलायचं आहे', असे सांगून आरोपीने संबंधित तरुणीला एका लॉजमध्ये नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आरोपीने अत्याचार केला. केवळ एवढ्यावरच न थांबता, या घटनेची कुणालाही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस येताच शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ७४, ३५१(२) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम ३ (१) (w) (i), ३(१) (w) (ii), ३(२) (v) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून समाजात महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, ई-साक्ष संकलनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

Topics mentioned in this article