अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana Road Accident : बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर भोलजीजवळ झालेल्या अपघातामध्ये तेलंगाना राज्यातील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हे दाम्पत्य लग्नासाठी तेलंगणातून जळगावला निघाले होते. मात्र काही वेळाने त्यांचं लोकेशन सापडत नव्हतं. याशिवाय त्यांचा फोन नॉट रिचेबल झाल्याने कुटुंबाला चिंता लागली होती. पोलिसात तक्रार केल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये त्यांची कार आणि दाम्पत्याचा मृतदेह सापडला.
दाम्पत्यासोबत नेमकं काय घडलं?
वडनेर उड्डाण पुलाजवळील झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत दाम्पत्याचे मृतदेह सापडले. अखेर 29 नोव्हेंबरच्या रात्री दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तीन दिवस चर्चेत असलेल्या या प्रकरणाने राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा यंत्रणेवर सवाल उपस्थित केला जात आहे. तेलंगानातून जळगाव खान्देशी लग्न सोहळ्यासाठी निघालेल्या दाम्पत्याची कार 27 नोव्हेंबर रोजी रात्री वडनेर उडानपुरानजीक असलेल्या जुन्या जुडपाणी आच्छादलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात डोलारखेड तालुका पाचोरा येथील पद्मसिंह दामू पाटील आणि त्यांची पत्नी नम्रता पाटील यांचा मृत्यू झाला. नांदुरा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
नक्की वाचा - Buldhana News: जळगावला निघाले पण रस्त्यातच जोडपं रहस्यमयरीत्या गायब झाले, बेपत्ता होण्यामागचं गुढ वाढले?
लग्न सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने
लग्नातील वर-वधू दोन्हींकडे या दाम्पत्याचे जवळचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण लग्नसोहळ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी लग्न सोहळा अत्यंत साध्या आणि शांत पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे.
जुन्या चार चाकी घरी नेण्याचा निर्णय ठरला जीवघेणा..
पद्मसिंह पाटील यांनी अलीकडेच नवीन कार घेतली होती. जुनी चार चाकी जळगावला नेण्यासाठी तेलंगणा ते जळगाव खान्देश असा 800 किलोमीटरचा प्रवास त्यांनी स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. एरवी ते विमानाने प्रवास करत असत. मात्र यावेळी नियतीनं काहीतरी वेगळंच लिहिलं होते आणि हा प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला.