अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana News: मुलगी घरातून अचानक बेपत्ता होते आणि काही दिवसांनी एका मुलीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील जळालेला मृतदेह पोलिसांना सापडतो. पोलीस तपासाची चक्रे फिरवतात आणि धक्कादायक म्हणजे, त्या मुलीचे वडील आणि भाऊ स्वतःच 'आम्हीच तिचा खून केला' अशी कबुली देतात. मात्र, 20 दिवसांनंतर अचानक तीच मुलगी पोलीस ठाण्यात चालत येते आणि सांगते, "मी जिवंत आहे!" या एका वाक्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. जळगाव जामोद येथील या कथित हत्याकांड प्रकरणात आता एक नवीन वळण आले असून शिवानीच्या वडिलांचा खळबळजनक जबाब समोर आला आहे.
काय आहे वडिलांचा जबाब?
मुलगी घरून पळून गेल्यामुळे समाजात बदनामी झाली, या संतापाने आणि दुःखाने शिवानीचे वडील बापूराम कलमेकर पेटून उठले होते. याच संतापाच्या भरात त्यांनी आणि त्यांच्या मुलाने चक्क न केलेल्या खुनाचा आरोप स्वतःच्या अंगावर घेतला. जळगाव जामोद परिसरात मिळालेला तो अनोळखी मृतदेह आपल्याच मुलीचा आहे, असे समजून आणि रागाच्या भरात त्यांनी पोलिसांना सांगितले की आम्हीच तिचा खून करून मृतदेह जाळला.
पोलिसांनीही कोणताही डीएनए अहवाल किंवा ठोस पुराव्याची वाट न पाहता केवळ या कबुली जबाबावर विश्वास ठेवला आणि बाप-लेकाला तुरुंगात धाडले.
( नक्की वाचा : Buldhana News : बाप-भावावर हत्येचा डाग, पण मुलगी जिवंत परतली! पोलिसांच्या अजब तपासाची धक्कादायक कहाणी )
वडिलांचा महत्त्वाचा खुलासा
बुलढाणा कारागृहातून सुटका झाल्यानंतर बापूराम कलमेकर यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, पोलिसांनी त्यांच्यावर कोणताही दबाव आणला नव्हता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून त्यांनी हा गुन्हा कबूल केला नव्हता. केवळ मुलगी पळून गेल्याचा जो राग मनात होता, त्यातूनच आपण हे गंभीर पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यामुळे तपास यंत्रणांची कशी दिशाभूल झाली आणि पोलिसांनी किती घाईने कारवाई केली, हे आता चव्हाट्यावर आले आहे.
पोलिसांवर मोठी कारवाई
एका जिवंत व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा नोंदवून निष्पाप लोकांना तुरुंगात पाठवल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर, जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे आणि इतर 3 कर्मचाऱ्यांना तातडीने जिल्हा मुख्यालयात रिपोर्टिंग करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये भररस्त्यात नेमकं काय घडलं? एका बाटलीसाठी हॉटेल चालकावर तुटून पडले नशेखोर, पाहा VIDEO )
तो जळालेला मृतदेह नेमका कोणाचा?
शिवानी जिवंत परतल्यामुळे कलमेकर कुटुंबाची निर्दोष सुटका तर झाली, पण आता पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे. राजुरा धरण परिसरात 26 एप्रिल रोजी जो अर्धवट जळालेला आणि शिर नसलेला मृतदेह सापडला होता, तो नेमका कोणाचा आहे? पोलिसांनी चुकीच्या ओळख पटवण्याच्या नादात मूळ गुन्हेगाराला मोकळे रान तर दिले नाही ना, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या अज्ञात मुलीच्या खुनाचे रहस्य आता अधिक गडद झाले असून, पोलीस पुन्हा एकदा शून्यापासून तपास सुरू करत आहेत.