धानोरा पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानाने आज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत सैनिकाचे नाव गिरीराज रामनरेश किशोर (30) असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गिरीराज किशोर यांना आज सकाळी धानोरा पोलीस ठाण्यातील एका मोर्चात तैनात करण्यात आलं होतं. दरम्यान रात्री 10.00 वाजता त्याने स्वतःच्या रायफलने गोळी झाडून घेतली. घटनेनंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने आत्महत्या केली की चुकून गोळी लागली हे तपासानंतरच स्पष्ट होईल.
नक्की वाचा - Akola News : शेतामध्येच रोडग्याचा बेत ठरला; चूल पेटवली...धूर झाला अन् एका महिलेने गमावला जीव!
कुटुंबांपासून दूर सेवा देणाऱ्या सैनिकांना येणाऱ्या मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी 11 डिसेंबर रोजी गडचिरोलीच्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकानेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्याआधी, 12 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकानेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. मानसिक ताणामुळे जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत.