Chandrapur News : मंदिराशेजारी OYO, संतापलेल्या नागरिकांची OYO हटाव मोहीम; आमदारांचाही पाठिंबा

एकट्या बल्लारपूर वळणमार्गावर OYO लिहिलेली चौदाहून अधिक हॉटेल्स आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी

ऑनलाइन हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म OYO ने काल 5 जानेवारीपासून आपल्या चेक-इन पॉलिसीमध्ये मोठे बदल केले आहेत. सुरुवातील हे बदल मीरतमध्ये करण्यात येणार आहे. नव्या बदलाअंतर्गत आता अविवाहित जोडप्यांना OYO मध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. स्थानिकांकडून येणाऱ्या तक्रारी, कायदा-सुव्यवस्थेसाठी OYO ने हे पाऊल उचललं सांगितलं जात आहे. ही बातमी ताजी असताना चंद्रपुरातील नागरिकांनी OYO विरोधात आंदोलन पुकारलं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेले सहा महिने चंद्रपूर शहरातील बल्लारपूर वळण मार्ग व इतर भागात मोठ्या संख्येने OYO हॉटेल दिसून येत आहे. प्रेमी युगुलांना योग्य ती सुविधा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी आताशा ही हॉटेल्स बदनाम झाली आहेत. एकट्या बल्लारपूर वळणमार्गावर OYO लिहिलेली चौदाहून अधिक हॉटेल्स आहेत. शहराच्या इतर भागातही या हॉटेलचे पीक आले आहे. शासनाची, मनपाची वा OYOची परवानगी न घेता हे हॉटेल सर्रासपणे अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देऊ लागल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत. 

नक्की वाचा - OYO Hotel Booking : OYO मध्ये अविवाहित जोडप्याला NO Entry; Check-in पॉलिसीमध्ये मोठे बदल

बल्लारपूर वळण मार्गावरील पुरातन अष्टभुजा मंदिराच्या बाजूला नव्यानेच उभारण्यात आलेल्या एका हॉटेलला हा फलक लागल्यानंतर नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. प्रशासनाला याबाबत अवगत करूनही कुठलीही कारवाई झाली नाही. त्यावरून ओयो हटवा मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी चक्क हॉटेल समोरच भजन आंदोलन केले. ही गांधीगिरी लक्षात घेताच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील अनाधिकृत हॉटेल्स हटवा अशी मागणी प्रशासनाला केली आहे. समाज स्वास्थ बिघडेल व मुली फसविल्या जातील असेही जोरगेवारांनी स्पष्ट केले आहे. आता या महत्त्वाच्या मुद्यावर शासन काय भूमिका घेते याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात अनधिकृत हॉटेलची चौकशी करून तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. 
 

Advertisement