Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील बळ्हेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले 48 वर्षीय पोलिस नाईक नानासाहेब रामजी दिवेकर यांची निघृण हत्या करून त्यांचा मृतदेह त्यांच्याच घराशेजारील पडीक जागेत पुरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात आणि जिल्ह्यात मोठी खळबळजनक उडाली असून, खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, नानासाहेब दिवेकर हे मूळचे बळ्हेगावचे रहिवासी असून ते पडेगाव येथून ड्युटीवर ये-जा करत असत. १ जानेवारीपर्यंत ते कर्तव्यावर होते, त्यानंतर वडिलांना भेटण्यासाठी ते गावी आले होते. 2 जानेवारीच्या सकाळपर्यंत ते सोशल मीडियावर सक्रिय होते, मात्र त्यानंतर अचानक त्यांचा संपर्क तुटला. वडिलांचा फोन लागत नसल्याने त्यांच्या मुलाने शोध घेण्यास सुरुवात केली.
गावातील सरपंच आणि नातेवाईकांकडे चौकशी करूनही काहीच माहिती न मिळाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. शिऊर पोलिसांनी रविवारी दुपारी दिवेकर यांच्या बळ्हेगाव येथील घराची झडती घेतली. यावेळी नानासाहेबांचा मोबाईल चक्क पलंगाखाली सापडल्याने संशय बळावला. घराच्या शेजारील पडीक जागेत ताजी माती उकरलेली दिसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष तेथे खोदकाम केले.
घराबाहेर आढळला मृतदेह..
सायंकाळी ६:३० च्या सुमारास नानासाहेबांचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन संशयित ताब्यात घेण्यात आले आहे.