10 वर्षांची प्रतीक्षा, बाळाचं बारसं, आनंद...अन् मद्यधुंद तरुण; घटनास्थळाचे CCTV फुटेज आले समोर

दारूच्या (Drunk and drive) नशेत बेधुंद झालेले आणि डोक्यात मस्ती असलेल्या तरुणांनी बेसरकर दाम्पत्याच्या गाडीला धडक दिली आणि सर्व काही संपलं.

Advertisement
Read Time: 2 mins
छत्रपती संभाजीनगर:

पुण्याचं बेसरकर दाम्पत्याला दहा वर्षांनी बाळ झालं होतं. कुटुंब अतिशय आनंदात होतं. बाळाचं बारसं करण्यासाठी कुटुंबीय अमरावतीला आले होते. सर्व कार्यक्रम छान पार पडला. आपल्या छकुल्याला घेऊन बेसरकर दाम्पत्य अमरावतीहून पुण्याला निघाले. बाळाचे वडील अजय बेसरकर कार चालवत होते. पुणे गाठण्याआधीच आपलं बाळ आणि पत्नी आपल्याला सोडून निघून जाईल याचा विचारही त्यांनी केलं नसेल.

दारूच्या (Drunk and drive) नशेत बेधुंद झालेले आणि डोक्यात मस्ती असलेल्या तरुणांनी बेसरकर दाम्पत्याच्या गाडीला धडक दिली आणि सर्व काही संपलं. शुक्रवारी (13 सप्टेंबर) दुपारी चार वाजता संभाजीनगरपासून (Chhatrapati Sambhajinagar) जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोकनाक्याजवळ ही घटना घडली. 

दोन्ही आरोपी


 
दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या बेसरकर कुटुंबाच्या कारला स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. ज्यात चौघांचा मृत्यू झाला. यात सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. पुण्याचे अजय व मृणाली यांना दहा वर्षांनंतर बाळ झाल्याने त्यांनी मोठ्या आनंदात बारशाचा कार्यक्रम केला. कार्यक्रम पार पडल्यानंतर ते अमरावतीहुन पुण्याकडे निघाले होते. तर पुण्यात मृणाली व बाळाची काळजी घेण्यासाठी अजय यांनी त्यांच्या सासू आशालता पोपळघट यांना सोबत घेऊन जात होते. यावेळी त्यांच्यासोबत मृणाल हिच्या बहिणीची सात वर्षांची मुलगीही होती. या अपघातात दीड महिन्याच्या बाळासह, आई, आजी आणि सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. 

याचवेळी मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या दोघांच्या अक्षम्य चुकीमुळे चौघांना जीव गमवावा लागला. अपघातास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांना अपघाताचा प्रसंग सांगताना ऊर भरून आला. संतापजनक बाब म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोघांच्या चेहऱ्यावर चार निष्पाप बळी घेतल्याचा थोडीही लाच वा दुःख दिसत नव्हतं. 

राज्यात गेल्या दोन महिन्यात एकामागून एक हिट अँड रनच्या घटना घडत आहे. अशात आता संभाजीनगर ड्रिंक अँड ड्राईव्हचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दारू पिऊन रस्त्यावर लोकांना किड्या मुंग्या सारखं समजून चिरडणाऱ्या या लोकांना आता वेळीच धडा शिकवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.